MARD Doctor Strike : मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर आजपासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 10:49 AM2021-10-01T10:49:14+5:302021-10-01T10:50:38+5:30
मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी राज्यभरात १ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व निवासी डॉक्टरांचा समावेश आहे.
नागपूर : कोविड काळातील शैक्षणिक फी माफीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने सेंट्रल मार्डने संपाचे हत्यार उपसले आहे. १ ऑक्टोबरपासून मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टरसंपावर जात आहेत.
रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून दोन्ही रुग्णालयांमध्ये सहायक प्राध्यापकांच्या वॉर्डात ड्युटी लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अस्थायी सहायक प्राध्यापकही आपल्या मागण्यांना घेऊन ४ ऑक्टोबरपासून संपावर जात आहेत. यादरम्यान तोडगा न निघाल्यास शासकीय रुग्णालय अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कोरोना काळातील फी माफी, कोविड प्रोत्साहन भत्ता, हॉस्टेल समस्या, पालिकेतील निवासी डॉक्टरांचा टीडीएस अशा विविध मुद्द्यांवर फक्त आश्वासनं मिळाली पण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या संपामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. या संपामुळे रुग्णव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. हा संप होऊ नये म्हणून प्रशासन आणि डॉक्टरांची २-३ तास चर्चा झाली. मात्र, प्रशासनाकडून डॉक्टरांच्या मनधरणीचे प्रयत्नही निष्फळ ठरले. दरम्यान आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सेवा सुरू राहतील, संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, सध्या राज्यातील कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी कोरोना संकट कायम आहे. त्यात इतर आजारांचे रुग्ण, शस्त्रक्रिया यामुळे रुग्णालयावरील ताण वाढत आहे. अशातच निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.