मेयो, मेडिकलमध्ये उसनवारीवर औषधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:35 AM2017-11-07T00:35:43+5:302017-11-07T00:35:58+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधी खरेदीसाठी असलेले दर करार (रेट कॉन्ट्रॅक्ट) संपून तीन महिन्यांवर कालावधी झाला आहे, ...
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधी खरेदीसाठी असलेले दर करार (रेट कॉन्ट्रॅक्ट) संपून तीन महिन्यांवर कालावधी झाला आहे, तर दुसरीकडे औषधी खरेदीची जबाबदारी ‘हाफकीन’ कंपनीवर सोपविल्याने पुरवठादाराने औषधे देणे बंद केले आहे. परिणामी, जीवनरक्षक व जीवनापयोगी औषधांचा तुटवडा पडला आहे. याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असून, रुग्णांच्या नातेवाईकांवर पदरमोड करून औषध विकत घेण्याची वेळ आली आहे. तर नागपूरच्या मेयो, मेडिकलला उसनवरीवर औषधी घेऊन दिवस काढावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) या दोन्ही रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात फार पूर्वीपासून औषधांच्या नावाने ठणठणाट आहे. आता अपघात विभाग व अतिदक्षता विभागातही औषधांचा तुटवडा पडला आहे. जीवनरक्षक औषधांचा जेमतेम साठा असल्याने, दोन्ही रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. तातडीच्या औषधोपचारासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाची (डीएमईआर) ‘आरसी’ ४ आॅगस्ट रोजी संपली. बहुसंख्य रुग्णालयांकडून ‘आरसी’ नूतनीकरणाचे पत्र व स्मरणपत्रही गेले. ‘लोकमत’नेही महिनाभरापूर्वी ‘राज्यातील मेडिकल गोरखपूरच्या मार्गावर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताला घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी ‘आरसी’ला मुदतवाढ देण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. तर सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सचिवांनी तत्काळ मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले होते. परंतु आता याला महिना होत असतानाही ‘आरसी’ची मुदतवाढ किंवा नूतनीकरण झाली नसल्याने सर्वच शासकीय रुग्णालये अडचणीत आली आहेत.
औषध पुरवठा ठप्प
शासनाने १५ आॅगस्ट २०१७ पासून औषधी खरेदीची जबाबदारी ‘हाफकीन’ कंपनीवर सोपविली, तसे अध्यादेशही काढले. परंतु या कंपनीकडून अद्यापही औषधी खरेदी झालेली नाही. दुसरीकडे या निर्णयाने औषधांची देयके मंजूर होणार नाही, या विचारातून पुरवठादाराने औषधी देणेच बंद केले. यामुळे औषधांची बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
मेयोला उसनवारीवर ५०० सलाईन
‘आरसी’ संपल्यानंतर मेडिकलने सलाईनचे विशेष नियोजन करून ठेवले होते. यामुळे सलाईनचा तुटवडा नसला तरी जीवरक्षक औषधे-प्रतिजैविकांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. मेयोत यापेक्षाही कठीण स्थिती आहे. सलाईनचा साठा संपल्याने मेडिकलकडून मेयोने पाचशेवर सलाईन उसनवारी घेतल्या. यवतमाळ मेडिकलनेही नागपूर मेडिकलला सलाईनची मागणी केली असल्याची माहिती आहे. मेयो, मेडिकलच्या औषध तुटवड्यावर अधिकाºयांशी चर्चा करून लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल.
-संजय देशमुख, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग