नागपूरचे मेयो होत आहे चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:14 AM2018-05-26T00:14:43+5:302018-05-26T00:15:32+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सफाई व्यवस्थेला घेऊन वैद्यकीय अधीक्षकांपासून ते अनेक वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली होती, याला गंभीरतेने घेत रुग्णालय प्रशासनाने ‘बीव्हीजी’ कंपनीला सफाईचे नवे कंत्राट दिले. या कंपनीने २२० कर्मचारी उपलब्ध करून दिल्याने रुग्णालय चकाचक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सफाई व्यवस्थेला घेऊन वैद्यकीय अधीक्षकांपासून ते अनेक वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली होती, याला गंभीरतेने घेत रुग्णालय प्रशासनाने ‘बीव्हीजी’ कंपनीला सफाईचे नवे कंत्राट दिले. या कंपनीने २२० कर्मचारी उपलब्ध करून दिल्याने रुग्णालय चकाचक होत आहे.
केवळ विदर्भच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातील सामान्य जनतेला मेयो रुग्णालयाचा मोठा आधार वाटतो. परंतु येथील विखुरलेल्या इमारती व नव्याने सुरू झालेल्या २५० खाटांचे सर्जिकल कॉम्प्लेक्समुळे सोयी पुरविणे रुग्णालय प्रशासनाला अवघड जात होते. विशेषत: सफाईला घेऊन मेयो प्रशासन नेहमीच अडचणीत येत होते. रुग्णालयाकडे केवळ ८० सफाई कर्मचारी त्यातही अनेकांचे वय ५० वर गेल्याने तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांच्याकडून कामे करून घेणे शक्य होत नव्हते. यावर उपाय म्हणून काही महिन्यांपूर्वी सफाई कामांचे कंत्राट एका कंपनीला दिले. या कंपनीच्या ८० कर्मचाऱ्यांवर सफाईची जबाबदारी देण्यात आली. मात्र, कंपनीच्या विरोधात काही सफाई कर्मचारी गेल्याने व यातूनच काम बंद आंदोलन झाल्याने रुग्णालय अडचणीत आले होते. प्रशासनाने याला गंभीरतेने घेत हे कंत्राटच संपुष्टात आणले. १० मे पासून ‘बीव्हीजी’ कंपनीला सफाईचे नवे कंत्राट दिले. या कंपनीने २२० कर्मचारी उपलब्ध करून दिले. प्रशासनाने या कर्मचाऱ्यांवर २५० खाटांचे सर्जिकल कॉम्प्लेक्स, सर्व अतिदक्षता विभाग व कॅज्युअल्टीची जबाबदारी सोपविली आहे आहे. गेल्या दोन आठवड्यातच या कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी बजावल्याने रुग्णालयाची सफाई डोळ्यात भरत आहे. मेयो प्रशासनाचे या सफाईवर ३.८६ कोटी रुपये वर्षाला खर्च होणार आहे.
‘आरएमओ’ वसतिगृह हस्तांतरित
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय) गेल्या अनेक वर्षांपासून निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (आरएमओ) वसतिगृहाला घेऊन त्रुटी काढत होती. गेल्या दोन वर्षांपासून या वसतिगृहाचे बांधकाम सुरू होते. गुरुवारी या इमारतीचे मेयो रुग्णालयाकडे हस्तांतरण झाले. यामुळे जुने वसतिगृहाचे ९६ व नवीन वसतिगृहाचे ९८ मिळून १९४ खोल्या उपलब्ध झाल्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निवासाचा मोठा प्रश्न मिटला आहे.