मेयो : वेतनासाठी परिचारिकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 01:02 AM2020-01-29T01:02:33+5:302020-01-29T01:03:39+5:30
दर महिन्याच्या ५ तारखेला वेतन देण्याचा नियम असताना २५ तारीख नंतरच वेतन होत असल्याचा निषेध म्हणून मंगळवारी सकाळी अडीच तास काम बंद ठेवून परिचारिकांनी आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दर महिन्याच्या ५ तारखेला वेतन देण्याचा नियम असताना २५ तारीख नंतरच वेतन होत असल्याचा निषेध म्हणून मंगळवारी सकाळी अडीच तास काम बंद ठेवून परिचारिकांनी आंदोलन केले. या प्रकारामुळे रुग्णालयात खळबळ उडाली. विशेष म्हणजे, १०.३० वाजूनही कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लिपीक आले नसल्याने, त्याचा संतापही परिचारिकांनी व्यक्त केला.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), रुग्णालयाचा कणा म्हणून परिचरिकांकडे पाहिले जाते.
मागील दीड वर्षांपासून परिचारिकांच्या वेतनांचा प्रश्न टोलवला जात होता. सेवार्थ सुरू झाल्यानंतर १ तारखेला वेतन होईल, असे आश्वासन दिले जात होते, परंतु मागील तीन वर्षात एकदाही १ तारखेला वेतन झाले नाही. दहा ते बारा दिवस उलटून गेल्यानंतर वेतन मिळायचे मात्र डिसेंबर २०१९ चे वेतन २६ जानेवारी उलटून गेल्यानंतरही मेयो प्रशासनाने परिचारिकांच्या वेतनासंदर्भात कोणतीही दखल घेतली नाही. अखेर संतप्त झालेल्या परिचारिकांनी वॉर्डात नर्सिग केअर सोडून वेतनासाठी आंदोलने करीत बसायचे का, असा सवाल करीत अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्या कार्यप्रणालीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. परिचारिकांनी अचानक पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे अनेक वॉर्डात परिचारिकांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. दोन ते अडीच तास रुग्णसेवेचे गणितं बिघडले. रुग्णांना औषधं देण्यापासून तर रुग्णांच्या नोंदीही रखडल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.
महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशनतर्फे मंगळवारी आंदोलन करण्यात आले असून यापूर्वी दर दिवसाला येथील लिपिकांकडे वेतनासंदर्भात विचारपूस करण्यात येत होती. परंतु वेतन न निघाल्यास आंदोलनाचा इशारा दिला, परंतु दखल घेतली नसल्यामुळे मेयोतील परिचारिकांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारले. मेयोतील काही ठिकाणच्या सेवा अडीच तास कोलमडल्या.
प्रशासकीय अधिकारीच नसल्याचा परिणाम
मेयोमध्ये कायमस्वरुपी प्रशासकीय अधिकाऱ्याची खुर्ची रिकामी आहे. यामुळे कर्मचाऱ्यांपासून तर परिचारिकांच्या, डॉक्टरांच्या वेतनाचा प्रश्न उभा ठाकतो. दर महिन्याला वेळेवर वेतन होईल, असे आश्वासन दिले जाते. परंतु वेळेवर वेतन होत नाही. यामुळे परिचारिकांनी मेट्रन यांना रीतसर अर्ज देऊन अधिष्ठाता डॉ. केवलिया यांच्या कार्यालयावर धडक दिली.