मेयो : सुरक्षा रक्षक व नातेवाईकांमध्ये पुन्हा जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:11 PM2019-04-12T22:11:31+5:302019-04-12T22:13:23+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पुन्हा एकदा महाराष्ट्र सुरक्षा बलचे (एमएसएफ) जवान आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये जुंपली. जवानाने कायदा हातात घेत नातेवाईकाला मारहाण करून त्याचा डोळा फोडल्याची नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली, तर नातेवाईकाला मारहाण केली नसल्याचे ‘एमएसएफ’चे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, सुरक्षा रक्षक व नातेवाईकांमध्ये वाद होण्याची या वर्षातील ही तिसरी घटना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पुन्हा एकदा महाराष्ट्र सुरक्षा बलचे (एमएसएफ) जवान आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये जुंपली. जवानाने कायदा हातात घेत नातेवाईकाला मारहाण करून त्याचा डोळा फोडल्याची नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली, तर नातेवाईकाला मारहाण केली नसल्याचे ‘एमएसएफ’चे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, सुरक्षा रक्षक व नातेवाईकांमध्ये वाद होण्याची या वर्षातील ही तिसरी घटना आहे.
मेयोमध्ये स्त्री रोग व प्रसुती विभागाचा १५ व १६ क्रमांकाचा वॉर्ड आहे. या वॉर्डात केवळ महिलांना प्रवेश आहे. एखाद्यावेळी पुरुषांना जेवण्याचा डबा पोहचविता येतो. प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास एका रुग्णाचे नातेवाईक डबा घेऊन जाण्याच्या बहाण्याने दोन-तीनदा वॉर्डात शिरले. याची तक्रार वॉर्डातील निवासी डॉक्टराने ‘एमएसएफ’च्या जवानांकडे केली. जवानांनी नातेवाईकांना हटकले. यावरून वाद झाला. नातेवाईकांनी मोमीनपुऱ्यात असलेल्या इतरही नातेवाईकांना बोलावून घेतले. यामुळे नातेवाईक आणि जवानांमध्ये चांगलीच मारहाण झाली. यात एका नातेवाईकाचा डोळ्याच्या खालचा भाग जखमी झाला. त्यातून रक्त येत असल्याचे पाहत नातेवाईक आणखी भडकले. मात्र त्याचवेळी मेयो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दोघांचीही समजूत काढली. यामुळे प्रकरण निवळले. परंतु याला घेऊन नातेवाईकांनी तहसील पोलीस ठाण्यात ‘एमएसएफ’च्या विरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचे काही मोबाईल व्हिडीओ व्हायरल झाले. यात ‘एमएसएफ’चे जवान एका रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण करताना आणि मोबाईल हिसकावताना दिसून येतात. तर दुसºया एका ‘व्हिडीओमध्ये नातेवाईक जवानांना शिवीगाळ करताना दिसतात.
या संदर्भात ‘एमएसएफ’चे रमेश तायडे म्हणाले, आम्ही डॉक्टर व रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आहोत. महिलांच्या वॉर्डात पुरुषांना जाण्यास मनाई आहे. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना वॉर्डात जाण्यास रोखल्याने हा वाद निर्माण झाला. आम्ही कायदा हातात घेतला नाही. आमच्या हातात काठी असलीतरी त्याचा उपयोग आम्ही केवळ भीती दाखविण्यापुरताच करतो. जखमी झालेला रुग्णाचा नातेवाईक हा कुणाच्यातरी हातातील घड्याळ लागल्याने जखमी झालेला आहे.
घटनेची चौकशी केली
मेयोचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या घटनेची प्राथमिक चौकशी करण्यात आली. ‘एमएसएफ’ आणि रुग्णांचे नातेवाईक या दोघांनाही समजाविण्यात आलेले आहे. पुढे अशी घटना होऊ नये म्हणून मेयो प्रशासन यावर उपाययोजना करणार आहे.