मेयोतील निवासी डॉक्टर संपावर :हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:05 AM2019-02-07T00:05:36+5:302019-02-07T00:06:20+5:30
एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील निवासी डॉक्टर्सनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशारा निवासी डॉक्टर्सनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील निवासी डॉक्टर्सनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशारा निवासी डॉक्टर्सनी दिला आहे.
राज्य सरकार व रुग्णालय प्रशासन सुरक्षेचे केवळ आश्वासन देत आहे. परंतु, आता संयमाचा अंत झाला आहे. त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत संप कायम ठेवला जाईल, असे मार्डचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड, महासचिव डॉ. अंचलेश टेकाम, डॉ. गोविंद चंद्रकार व उपाध्यक्ष डॉ. असीमा गर्ग यांनी सांगितले. २००७ मध्ये निवासी डॉक्टर्सवर तलवार उगारण्यात आली होती. त्यावेळी कॅन्डल मार्च काढून घटनेचा निषेध करण्यात आला होता. रुग्णाचे नातेवाईक सतत हल्ले करीत असल्यामुळे डॉक्टर्स असुरक्षित आहेत. मंगळवारच्या घटनेमुळे खुद्द सुरक्षा कर्मचारीही सुरक्षित नसल्याचे सिद्ध झाले. रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन सादर केले होते. त्यानंतरही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली नाही. मेयोमध्ये ११० सुरक्षा कर्मचाºयांची गरज असताना, केवळ ६८ सुरक्षा कर्मचारी देण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर आठ सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात करणे गरजेचे आहे. तसेच, डॉक्टरांच्या कक्षात अलार्म सिस्टिम लावणे व रुग्णांसाठी पास सिस्टिम सुरू करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
असा झाला वाद
न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णासोबत केवळ एक किंवा दोन सदस्य आत येऊ शकतात. परंतु, मंगळवारी रात्री एका रुग्णासोबत सात-आठ सदस्य आत येत होते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबविले. त्यावरून रुग्णासोबतचा ऑटोचालक शिवीगाळ करायला लागला. त्याने महिला सुरक्षा कर्मचाऱ्याला हातही हावला. त्यामुळे इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केली. दुसरीकडे रुग्णाचे नातेवाईक सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गैरवर्तनाचा आरोप करीत आहेत.
आरोग्य व्यवस्था प्रभावित
सुमारे २०० निवासी डॉक्टर्स संपावर गेल्यामुळे मेयोतील आरोग्य व्यवस्था प्रभावित झाली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत वरिष्ठ व प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स रुग्णालय सांभाळत आहेत. असे असले तरी निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांना सांभाळणे कठीण झाले आहे. सर्वांना संपाचा त्रास सहन करावा लागत आहे.