मेयोत निवासी डॉक्टरांचे आंदोलन जारी : आयसीयूमध्ये सेवा बंद करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 08:53 PM2021-06-02T20:53:50+5:302021-06-02T20:54:27+5:30
Mayo resident doctors' agitation continuesमेयो इस्पितळातील सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये भरती कोरोना रुग्णांना दुसरीकडे हलविण्याच्या मागणीवरून निवासी डॉक्टरांनी बुधवारीदेखील आंदोलन जारी ठेवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेयो इस्पितळातील सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये भरती कोरोना रुग्णांना दुसरीकडे हलविण्याच्या मागणीवरून निवासी डॉक्टरांनी बुधवारीदेखील आंदोलन जारी ठेवले. जर मागण्या मान्य झाल्या नाही, तर गुरुवारी दुपारी १२ वाजता आयसीयूत सेवा देणे बंद करण्यात येईल, असा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे. आंदोलनामुळे मेयो इस्पितळातील आरोग्य सेवांवर परिणाम होत आहे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये भरती रुग्णांना दुसऱ्या जागी हलविले जाऊ शकते. सद्य:स्थितीत ५०० खाटा रिकाम्या आहेत. तरीदेखील रुग्णांना न हलविणे हे अयोग्य आहे. कोरोना नसलेल्या रुग्णांना मेयोत दाखल करून घेतले जात नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या नावावर खाटा आरक्षित करून ठेवण्यात आल्या आहेत, असे मेयो मार्डचे अध्यक्ष डॉ. रजत अग्रवाल यांनी सांगितले. निवासी डॉक्टरांशी या संबंधात चर्चा झाली आहे. त्यांना समजविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ते कामावर परततील, असा विश्वास मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी व्यक्त केला. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर आता म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाचे या रुग्णांकडे पूर्ण लक्ष आहे. कोरोनासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून जे दिशानिर्देश देण्यात येत आहेत, त्या आधारावरच काम सुरू आहे. मेयोच्या पातळीवर कुठलेही निर्णय झालेले नाहीत, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.