मेयोचे निवासी डॉक्टर आजपासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:27 PM2021-05-31T23:27:03+5:302021-05-31T23:27:41+5:30
Mayo resident doctors on strike कोरोना रुग्णांची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. मेयो हे ‘टर्शरी केअर सेंटर’ असल्याने, केवळ गंभीर रुग्ण पाहण्याची जबाबदारी निवासी डॉक्टरांची आहे. सध्या रुग्णालयात कोरोनाचे १००च्या आत रुग्ण आहेत. यामुळे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (एमओ) हे रुग्ण पाहायला हवे. निवासी डॉक्टरांना ‘नॉन कोविड’ रुग्णांची जबाबदारी द्यावी, या मागणीसाठी मेयोतील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने मंगळवारपासून सामूहिक आंदोलन म्हणजे संपाचे हत्यार उपसले आहे. विशेष म्हणजे, हे आंदोलन बेमुदत असल्याने रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णांची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. मेयो हे ‘टर्शरी केअर सेंटर’ असल्याने, केवळ गंभीर रुग्ण पाहण्याची जबाबदारी निवासी डॉक्टरांची आहे. सध्या रुग्णालयात कोरोनाचे १००च्या आत रुग्ण आहेत. यामुळे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (एमओ) हे रुग्ण पाहायला हवे. निवासी डॉक्टरांना ‘नॉन कोविड’ रुग्णांची जबाबदारी द्यावी, या मागणीसाठी मेयोतील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने मंगळवारपासून सामूहिक आंदोलन म्हणजे संपाचे हत्यार उपसले आहे. विशेष म्हणजे, हे आंदोलन बेमुदत असल्याने रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
मेयो ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ.राजेश अग्रवाल यांनी सांगितले, कोरोनाचे समान्य रुग्ण सांभाळण्यासाठी मागील वर्षी जवळपास ७५ वैद्यकीय अधिकारी (एमओ) मेयोला दिले होते. जेव्हा रुग्णसंख्या कमी होऊ लागली, तेव्हा त्यांनी ‘एमओ’ काढून घेतले. तिच स्थिती आता पुन्हा निर्माण झाली आहे. मागील आणि आता हेही वर्ष कोरोनाचे रुग्णसेवेत जात आहे. यामुळे ‘स्पेशालिस्ट’ डॉक्टर होण्यासाठी लागणारे शिक्षण, कौशल्य व अनुभव कधी मिळणार, हा प्रश्न आहे. कोरोना रुग्णामुळे शोध प्रबंधासाठी (थेसीस) इतर आजाराचे रुग्ण मिळेनासे झाले आहे. या सर्व समस्यांबाबत काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी कोरोनाचे रुग्ण कमी होताच, नॉनकोविड रुग्णांची जबाबदारी देऊ, असे आश्वासनही दिले होते, परंतु आता रुग्णसंख्या कमी होऊनही याबाबत चर्चा करण्यासाठी मागील १० दिवसांपासून ते वेळ देत नाही आहेत. यामुळे नाईलाजाने १ जूनपासून सामूहिक रजा आंदोलन करावे लागत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. रुग्णहिताच्या दृष्टीने निवासी डॉक्टर केवळ अतिदक्षता विभागत कार्यरत असतील, असेही डॉ.अग्रवाल म्हणाले.