नागपुरातील मेयोची विषाणू प्रयोगशाळा २४ तास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:10 AM2020-03-16T11:10:33+5:302020-03-16T11:11:52+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) मात्र कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासण्याचे कार्य दिवस-रात्र सुरू आहे.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूवर प्रतिबंधक उपाय म्हणून शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) मात्र कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासण्याचे कार्य दिवस-रात्र सुरू आहे. गेल्या चार दिवसात या प्रयोगशाळेने १०२ नमुन्यांची तपासणी करून त्याचा अहवाल दिला आहे. वाढत्या नमुन्यांच्या तुलनेत प्रयोशाळेत मनुष्यबळ कमी पडत आहे. यामुळे ‘एम्स’सह नागपूर व अकोला मेडिकलमधून मनुष्यबळाची मदत मागितली आहे. देशात वाढत्या विषाणूजन्य आजाराचा धोका लक्षात घेऊन २०१३-१४ मध्ये केंद्र सरकारने देशात आठसह चार राज्यस्तरीय व दोन प्रादेशिक विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेला मंजुरी दिली. यात महाराष्ट्राच्या वाट्याला नागपूरच्या मेयोला ही प्रयोगशाळा आली. २०१४-१५ मध्ये प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. याच काळात स्वाईन फ्लू व डेंग्यूचा प्रकोप वाढला होता. पहिल्याच वर्षात स्वाईन फ्लूचे १६०० तर डेंग्यूचे तीन हजार नमुने तपासण्यात आले होते.