मेयो : एमआरआय मिळाले मनुष्यबळ कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 11:25 PM2019-07-02T23:25:54+5:302019-07-02T23:27:06+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बहुप्रतिक्षित ‘एमआरआय’ यंत्र अखेर गेल्या महिन्यात दाखल झाले. या यंत्रासोबतच लवकरच ‘सिटीस्कॅन’ व ‘डी.एस.ए.’ यंत्र उपलब्ध होणार आहे. या यंत्रावरील तपासणीचा अहवाल तयार करण्यापासून ते यंत्र चालविणाऱ्या तंत्रज्ञापर्यंतचा ३० पदांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही. मेयो प्रशासनाचा ऑगस्ट महिन्यापर्यंत हे यंत्र रुग्णसेवेत सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे ‘एमआरआय’ मिळाले मनुष्यबळ कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बहुप्रतिक्षित ‘एमआरआय’ यंत्र अखेर गेल्या महिन्यात दाखल झाले. या यंत्रासोबतच लवकरच ‘सिटीस्कॅन’ व ‘डी.एस.ए.’ यंत्र उपलब्ध होणार आहे. या यंत्रावरील तपासणीचा अहवाल तयार करण्यापासून ते यंत्र चालविणाऱ्या तंत्रज्ञापर्यंतचा ३० पदांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही. मेयो प्रशासनाचा ऑगस्ट महिन्यापर्यंत हे यंत्र रुग्णसेवेत सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे ‘एमआरआय’ मिळाले मनुष्यबळ कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या आठ वर्षांपासून ‘एमआरआय’साठी प्रयत्न सुरू होते. हिवाळी अधिवेशनात या यंत्राला घेऊन चर्चाही झाली. ‘एमआरआय युनिट’ नसल्याच्या कारणाने ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (एमसीआय) मेयोतील ‘डिप्लोमा इन रेडिओ डायग्नोसिस’ची मान्यता काढून घेतली. ‘सिटीस्कॅन’ हे यंत्र कालबाह्य झाल्याने व जानेवारी २०१९ मध्ये बंद पडताच रुग्णालय प्रशासनाने दुरुस्तीच्या भानगडीत न पडता यंत्रच भंगारात काढले. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीतर्फे मेयो रुग्णालयाला विविध यंत्र खरेदीसाठी निधी मिळताच प्रक्रियेला सुरुवात झाली. जर्मनी येथील सिमेन्स कंपनीचे ‘एमआरआय’ यंत्र २६ जून रोजी मेयोत दाखल झाले. ‘१२८ स्लाईस सिटी स्कॅन’ व ‘डी.एस.ए.’ या यंत्राची खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत ही सर्वच यंत्रे रुग्णसेवेत सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यंत्र उपलब्ध होत असताना मनुष्यबळा विषयी कुणी निर्णय घेत नसल्याने मेयो प्रशासन अडचणीत आल्याचे चित्र आहे.
सूत्रानूसार, ही तिन्ही यंत्रे चालविण्यासाठी रेडिओलॉजी विभागाला एक सहयोगी प्राध्यापक, दोन सहायक प्राध्यापक, आठ तंत्रज्ञ, एक इन्चार्ज सिस्टर, पाच सिस्टर, आठ अटेन्डंट व पाच सफाई कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव पाच महिन्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता. परंतु मंजुरीच मिळाली नाही. मे महिन्यात पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत मनुष्यबळाची गरज आहे. अन्यथा यंत्र असताना मनुष्यबळ नसल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता आहे.