मेयोचे रुग्ण अर्धपोटी
By admin | Published: July 9, 2016 03:02 AM2016-07-09T03:02:18+5:302016-07-09T03:02:18+5:30
नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी केवळ मोजकाच आहार दिला जात असल्याने मेयोच्या रुग्णांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सकस आहारावरही प्रश्नचिन्ह : कर्मचाऱ्यांच्या संख्येवर ठरतो रुग्णांचा आहार
नागपूर : नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी केवळ मोजकाच आहार दिला जात असल्याने मेयोच्या रुग्णांवर उपासमारीची वेळ आली आहे. मेयोच्या पाकगृहात कर्मचाऱ्यांची तोकडी सोय व अद्ययावत यंत्रणा नसल्याने हा फटका बसत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
आजार लवकर आटोक्यात आणण्यासाठी रुग्णाला योग्य उपचारासोबत योग्य आहाराची गरज असते. रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. सध्याच्या स्थितीत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो)३५० वर रुग्णांना सकाळच्या नाश्तासह दोन वेळचे जेवण दिले जाते. रुग्णांच्या जेवणात तूर किंवा मसुरीचे वरण, भात, भाजी, पोळी असा मेनू ठरलेला आहे. परंतु तटपुंज्या कर्मचाऱ्यांमुळे कधी एक पोळी तर कधी तीही मिळत नसल्याचे वास्तव आहे. भाजीच्या नावाखाली दुधी भोपळ्याची व लाल भोपळ्याची रस्सेदार भाजी दिली जात आहे. नावाला वरण असले तरी त्यात केवळ पाणीच राहत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. याला पोषक आहार म्हणावे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, मेयोसारखीच मेडिकलच्याही पाकगृहाची स्थिती होती. येथेही कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांचा आहार अडचणीत आला होता. शासनही याकडे लक्ष देत नव्हते. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘रोटी मेकर’ यंत्र विकत घेतल्याने तूर्तासतरी यातून मार्ग काढण्यात त्यांना यश आले आहे. असेच यंत्र मेयोच्या पाकगृहात उपलब्ध झाल्यास मदत होऊ शकेल असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
चव नाहीच, ‘कॅलरीज’ तर दूरच
शासनाने मेयोच्या पाकगृहाला चवीचे आणि कॅलरीजचे नियम घालून दिले आहेत. मधुमेह, क्षयरोगाचे रु ग्ण, जळालेले रुग्ण, लहान मुले आणि गर्भवती महिलांना डॉक्टरांच्या निर्देशानुसार हाय कॅलरीज फूड देण्याचा आणि हा आहार आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तयार करण्याचा नियम आहे. वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचा ‘समाधानकारक’ असा शेरा जोवर मिळत नाही तोवर पाकगृहात तयार झालेला कुठलाही पदार्थ रु ग्णांना वितरित करता येत नाही. असे असतानाही, पोषक नसलेल्या मोजक्याच आहारावर ‘समाधानकारक’ शेरा दिला जात आहे. विशेष म्हणजे, आहराला चव राहत नाही ‘कॅलरीज’ तर दूरची गोष्ट असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.