मेयोत माती घोटाळा
By admin | Published: July 18, 2015 02:59 AM2015-07-18T02:59:46+5:302015-07-18T02:59:46+5:30
जागेवरच फेकलेल्या मातीच्या वाहतुकीचे वसुलले शुल्क :
संरक्षण भितीच्या बांधकामात गडबड
नागपूर : इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) संरक्षण भिंत बाधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातून निघालेली माती, रुग्णालयाच्या मैदानात फेकण्यात आली असली तरी ६.५ किलोमीटर दूर फेकण्यात आल्याचे दाखविल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, नियमानुसार महानगरपालिकेच्या नाक्याबाहेर माती टाकणे आवश्यक आहे, दर्शविण्यात आलेल्या किलोमीटरवर कोणताही नाका येत नाही. असे असतानाही बांधकाम विभागाने ३ लाख ८२ हजार १९७ रुपयांच्या वाहतुकीचे बिल सादर करून मंजुरी मिळविली आहे. १७८.५० रुपये प्रती घनमीटरनुसार वाहतुकीचे शुल्क वसूल करण्यात आले आहे.
बांधकाम विभागाकडे अर्ध्या किलोमीटरपासून २० किलोमीटरपर्यंत अंतराचे दर निश्चित केले आहे. परंतु बिलामध्ये ६.५ किलोमीटर दाखवून जे दर लावण्यात आले आहे, ते ‘सीएसआर रेट’मध्येच नाही. ६.५ किलोमीटरच्या अंतरासाठी १७५ रुपये प्रति घनमीटर निश्चित केले आहे. या दरात वाहनात माती भरणे, काढणे व फेकण्याच्या दराचाही समावेश आहे.
मेयोमध्ये संरक्षण भिंतीची माती फेकण्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर इतरही कामात हा प्रकार झाल्याची शंका वर्तविली जात आहे. या प्रकरणाच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष नीरज कुकडे यांनी लोकनिर्माण विभागाच्या मुख्य अभियंताला पत्र लिहून माहिती दिली आहे. त्यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेला पुरावा समोर करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सात दिवसांत यावर निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)