नागपूर मेट्रो पाहून जर्मनीच्या कार्ल्सरूहचे महापौर प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 10:11 PM2020-02-06T22:11:37+5:302020-02-06T22:14:10+5:30
जर्मनीच्या कार्ल्सरूह शहराचे महापौर डॉ. फ्रँक यांनी गुरुवारी एका उच्चपदस्थ प्रतिनिधी मंडळासोबत नागपूर मेट्रोने प्रवास केला. त्यांनी मेट्रो पुलावरून शहराचे सौंदर्य न्याहाळले. नागपूर मेट्रोचा विकास पाहून ते प्रभावित झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जर्मनीच्या कार्ल्सरूह शहराचे महापौर डॉ. फ्रँक यांनी गुरुवारी एका उच्चपदस्थ प्रतिनिधी मंडळासोबत नागपूर मेट्रोने प्रवास केला. त्यांनी मेट्रो पुलावरून शहराचे सौंदर्य न्याहाळले. नागपूर मेट्रोचा विकास पाहून ते प्रभावित झाले.
महापौर डॉ. फ्रँक यांच्या नेतृत्वात सरकारी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आठ जणांच्या शिष्टमंडळाने मेट्रोने सीताबर्डी ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास केला. नागपूर मेट्रो प्रकल्पाची गुणवत्ता आणि वेगवान कामाचे कौतुक केले.
जर्मनीच्या कार्ल्सरूह या शहरात २०१० पासून ३.५ किमी भूमिगत मेट्रो बनविण्याचे काम सुरू असून ते अजूनही पूर्ण झाले नाही. नागपूर मेट्रो २०१५ मध्ये सुरू होऊन चार वर्षांत ३८ किमी कार्यापैकी अर्ध्याहून अधिक कार्य पूर्ण केले आहे. दोन मार्गिकेवर मेट्रो धावायला लागली आहे. हे अचंबित करणारे आहे. मी अत्यंत प्रभावित झालो आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
सकाळी ९ वाजता शिष्टमंडळाने सीताबर्डी इंटरचेंज ते एअरपोर्टपर्यंत प्रवास करीत स्थानकावर उतरले. एअरपोर्ट स्थानकावरील महात्मा गांधींच्या कुटीजवळ येऊन त्यांनी मानवंदना दिली आणि स्थानकावरील सोईसुविधांचा आढावा घेतला. या स्थानकावरील फीडर सर्व्हिस म्हणजे ई-सायकल, ई-बाईक चालवून पहिली. परतीच्या मेट्रो प्रवासात प्रवाशांशी संवाद साधला. अधिकाऱ्यांशी बोलून प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.
भविष्यात सुरक्षित प्रवास करायचा असेल आणि रहदारीच्या समस्या टाळायच्या असतील तर मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक विकासाची गती वाढवायला हवी. प्रदूषणमुक्त आणि आरोग्यासाठी उपयुक्त नागपूर मेट्रो शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्यादरम्यान महामेट्रोतर्फे सुधाकर उराडे, महेश गुप्ता आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.