म्हैसूरचे महापौर अभ्यासासाठी नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:34 PM2019-12-30T22:34:11+5:302019-12-30T22:35:46+5:30
कर्नाटकमधील म्हैसूर शहराच्या महापौर पुष्पलता जगन्नाथ, उपमहापौर शफी अहमद, जिल्हाधिकारी अभिराम जी. शंकर, आयुक्त गुरुदत्त हेगडे आदींचे शिष्टमंडळ सोमवारी नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्नाटकमधील म्हैसूर शहराच्या महापौर पुष्पलता जगन्नाथ, उपमहापौर शफी अहमद, जिल्हाधिकारी अभिराम जी. शंकर, आयुक्त गुरुदत्त हेगडे आदींचे शिष्टमंडळ सोमवारी नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले. महापालिका मुख्यालयात महापौर कक्षामध्ये महापौर संदीप जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शहरातील प्रकल्पांसंदर्भात चर्चा केली. याशिवाय आयुक्त कक्षामध्ये आयुक्त अभिजित बांगर यांनीही शिष्टमंडळाशी संवाद साधला.
पुष्पलता जगननाथ यांच्या शिष्टमंडळाने भांडेवाडी येथे सुरू असलेल्या ‘बायो रिमेडिएशन’ प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पासंदर्भात मनपा उपअभियंता राजेश दुफारे यांनी सादरीकरण केले. झिग्मा ग्लोबल एनव्हान्स सोल्युशन प्रा.लि.चे संचालक नागेश प्रभू यांनी प्रकल्पाची माहिती दिली. भांडेवाडी येथे महापालिकेतर्फे ५३ एकरमध्ये प्रकल्प राबविला जात आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून काच, लोखंड, टायर आदींवर पुनर्प्रक्रिया केली जाते, तर माती व दगड वेगळे केले जातात. इतर कचऱ्यावर प्रक्रिया करून तो कचरा आरडीएफ या सिमेंट कंपनीला देण्यात येतो. आतापर्यंत येथील तीन एकरमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम झाल्याची माहिती नागेश प्रभू यांनी दिली.
म्हैसूर शहराची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. येथे सुमारे २ लाख टन कचरा १७ ते २० एकरांमध्ये आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणामध्ये म्हैसूर शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया यासंदर्भात वेगवेगळ्या शहरांमध्ये अभ्यास दौरा करण्यात आला. नागपूर शहरात राबविण्यात येत असलेला बायो रिमेडिएशन प्रकल्प इतर शहरातील प्रकल्पांपेक्षा उत्तम आहे. या प्रकल्पाची म्हैसूर शहरात अंमलबजावणी करणार असल्याचे म्हैसूर महापालिकेचे आयुक्त गुरुदत्त हेगडे यांनी सांगितले.