आयुक्तांच्या दाव्यांची महापौर करणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:20 PM2020-08-24T22:20:33+5:302020-08-24T22:23:09+5:30

नागपूरमध्ये कोविडचा प्रादुर्भाव दररोज वाढत असून मृत्यूसंख्या ५०० च्या घरात पोहचली आहे. मनपा प्रशासनाकडून रुग्णांसाठी व्यवस्था असल्याचा दावा केला जात आहे. तर कोविड रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, कोविड केअर सेंटरमध्ये पण रुग्णांना पाठविले जात नाही, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

The mayor will investigate the claims of the commissioner | आयुक्तांच्या दाव्यांची महापौर करणार चौकशी

आयुक्तांच्या दाव्यांची महापौर करणार चौकशी

Next
ठळक मुद्दे समित्यांची स्थापना : पदाधिकारी व प्रशासनातील वाद वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरमध्ये कोविडचा प्रादुर्भाव दररोज वाढत असून मृत्यूसंख्या ५०० च्या घरात पोहचली आहे. मनपा प्रशासनाकडून रुग्णांसाठी व्यवस्था असल्याचा दावा केला जात आहे. तर कोविड रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, कोविड केअर सेंटरमध्ये पण रुग्णांना पाठविले जात नाही, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दावे-प्रतिदावे विचारात घेता महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाने केलेल्या दाव्याची चौकशी करण्यासाठी विविध समित्यांची सोमवारी घोषणा केली. यातून प्रशासन व पदाधिकारी यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.
समित्यांमार्फत मनपाद्वारे नागपूरमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांत केलेली खाटांची व्यवस्था, कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध खाटांची संख्या, हॉटेल्स आणि मनपाच्या रुग्णालयात खाटांची व्यवस्था याची पाहणी करून आपला अहवाल मंगळवारी २५ ऑगस्टला दुपारी ४ वाजता आयोजित बैठकीत सादर करतील. मनपा सभेत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर संदीप जोशी यांनी कोविड - १९ बद्दल समन्वय करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची समिती गठित केली आहे. या समितीची बैठक सोमवारी मनपा मुख्यालयात पार पडली. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांनी २४ खासगी रुग्णालयांत १,८७६ खाटांची व्यवस्था करण्यात आली असून सद्य:स्थितीत ५७५ बेड्स उपलब्ध असल्याचे सांगितले.
मेयो, मेडिकल रुग्णालयात १२०० खाटांची व्यवस्था आहे. जीएमसीमध्ये ६०० बेड्स आहे त्यात ३४० रुग्ण भरती आहेत, आयजीएमसीमध्ये ६०० बेड्स आहेत त्यात २९५ रुग्ण भरती आहे, दोन्ही हॉस्पीटलमध्ये आॅक्सीजनची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच त्यांनी मनपा व्दारा संचालित कोविड टेस्टिंग सेंटरची माहिती दिली.
अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, आमदार निवास, पोलिस क्वॉर्टर पाचपावली, व्हीएनआयटी होस्टेल, सिम्बॉयसीस होस्टेल आणि वनामतीमध्ये २८०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ४,७३० खाटांची व्यवस्था रुग्णांसाठी सज्ज आहे. तसेच ३,३५६ खाटांची व्यवस्था प्रस्तावित आहे. हॉटेल्समध्येसुद्धा कोविड केअर सेंटरची परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाचे दावे आणि वर्तमान परिस्थितीमध्ये मोठी तफावत असल्याने सत्य परिस्थिती जाणण्यासाठी समित्या गठित करण्यात येत आहे. समित्या सत्य परिस्थितीची पाहणी करून आपला रिपोर्ट देतील, अशी माहिती संदीप जोशी यांनी दिली. बैठकीत आमदार प्रवीण दटके, यांच्यासह समितीतील सदस्य उपस्थित होते.

अशा आहेत समित्या
खासगी रुग्णालयांसाठी : उपमहापौर मनीषा कोठे यांच्या नेतृत्वात आरोग्य समिती सभापती वीरेन्द्र कुकरेजा, नगरसेवक संदीप सहारे, संजय बंगाले, दुनेश्वर पेठे व अति.आयुक्त संजय निपाणे यांच्या समितीची घोषणा केली.
शासकीय रुग्णालयांसाठी : दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात सुनील अग्रवाल, प्रफुल्ल गुडधे, वैशाली नारनवरे व डॉ. भावना सोनकुसळे.
कोविड टेस्ट सेंटरसाठी : वर्षा ठाकरे यांच्या नेतृत्वात दिव्या धुरडे आणि संचालक, घनकचरा व्यवस्थापन व उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार.
कोविड केअर सेंटरसाठी व हॉटेलची पाहणी : स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या नेतृत्वात सत्तापक्ष नेता संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, किशोर कुमेरिया, संजय महाकाळकर, विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती धर्मपाल मेश्राम व उपायुक्त निर्भय जैन.

आज महापौर, आमदारांची बैठक
नागपूर शहरात सद्य:स्थितीत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात नवीन उपाययोजना व निर्णय घेण्यास्तव मनपा पदाधिकारी आणि आमदारांची आज मंगळवारी दुपारी १२ वाजता मनपा मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे.

Web Title: The mayor will investigate the claims of the commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.