महापौरांची ५ मार्चला निवड
By admin | Published: February 28, 2017 02:02 AM2017-02-28T02:02:54+5:302017-02-28T02:02:54+5:30
महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज बुधवारी १ मार्चला दुपारी ३ पर्यंत सिव्हिल लाईन येथील ...
उपमहापौरांची निवडही त्याच दिवशी : उमेदवारी अर्ज १ मार्चला
नागपूर : महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज बुधवारी १ मार्चला दुपारी ३ पर्यंत सिव्हिल लाईन येथील महापालिकेच्या स्थायी समितीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात स्वीकारले जाणार आहेत. यासोबतच महापौर कोण होणार, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
५ मार्चला विशेष सभेत महापौर व उपमहापौर यांची निवड केली जाणार आहे. तत्पूर्वी अर्जाची छाननी व अर्ज मागे घेण्यात येणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. महापालिकेतील संख्याबळ विचारात घेता मतदानाची गरज भासणार नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
ज्येष्ठांना नको उपमहापौरपद
महापौरानंतर उपमहापौरपद महत्त्वाचे मानले जाते. परंतु भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक या पदासाठी उत्सुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या पदावर नवीन सदस्यांची निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थायी समितीत भाजपचे १२ सदस्य
महापालिकेच्या सभागृहातील सदस्य संख्येच्या आधारावर स्थायी समितीत प्रतिनिधित्व दिले जाते. १६ सदस्यीय स्थायी समितीत संख्याबळाचा विचार करता भाजपचे १२ तर काँग्रेसच्या तीन सदस्यांना संधी मिळणार आहे. बसपाच्या एका सदस्याला संधी मिळणार आहे. सभागृहातील सदस्यसंख्या विचारात घेता शिवसेना व राष्ट्रवादीला स्थायी समितीवर संधी मिळण्याची शक्यता नाही. १५१ सदस्यांत भाजपला ११.७५ तर काँग्रेसला ३.०७ सदस्यांचा कोटा मिळणार आहे.
तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?
महापालिकेत स्थायी समितीचे पद महत्त्त्वाचे मानले जाते. त्यामुळे पक्षाचे हित व विकास कामांचा विचार करून या पदावर नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री समर्थकाची या पदावर वर्णी लागणार असल्याची चर्चा असून, महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.