महापौराचे आदेश आयुक्तांना बंधनकारक असतात : संदीप जोशी यांचा मुंढेंना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:45 PM2020-06-01T23:45:03+5:302020-06-01T23:46:23+5:30
महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडत असताना आता महापौर संदीप जोशी यांनीही तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून प्रशासनात लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे असतात याची जाणीव करून दिली आहे. एवढेच नव्हे तर महापौराचे आदेश हे कायद्यानुसार आयुक्तांना बंधनकारक असतात, याचे स्मरणही त्यांनी मुंढे यांना करून दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडत असताना आता महापौर संदीप जोशी यांनीही तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून प्रशासनात लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे असतात याची जाणीव करून दिली आहे. एवढेच नव्हे तर महापौराचे आदेश हे कायद्यानुसार आयुक्तांना बंधनकारक असतात, याचे स्मरणही त्यांनी मुंढे यांना करून दिले आहे.
महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जाधव व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आयुक्त मुंढे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनीही कन्टेन्मेंट झोन व क्वारंटाईन सेंटरवरून मुंढे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता महापौर संदीप जोशी यांनीही उघडपणे मुंढे यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे. जोशी यांनी अलीकडेच आयुक्तांना पाठिवलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रशासनाची जबाबदारी जशी आयुक्त म्हणून आपली आहे तशीच या नगरीचा महापौर म्हणून माझीसुद्धा आहे. नागपूरच्या नागरिकांनी ती विश्वासाने लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर टाकली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनयमाच्या कलम ४ मध्ये प्राधिकरणाच्या बाबतीत नमूद केलेल्या स्पष्टतेबाबत आपण अवगत आहात, अशी मला अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधी व पदाधिकारी प्रशासनाचे दोन चाके आहेत. त्याप्रमाणे आपण कार्य करावे, त्याप्रमाणे आपण वागावे, अशी भावनाही त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
एमएलए होस्टेल क्वारंटाईन सेंटरमधील नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन मुळीच करीत नाहीत, याची पूर्ण माहिती घेऊनच आपण बोललो. याचदरम्यान लोणारा क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेले लोक छतावर कसे एकत्र होते, याचा फोटो जवळपास सर्वच वर्तमानपत्रांनी छापला. हीच परिस्थिती आमदार निवासातीलही असू शकते. अशा प्रकारे क्वारंटाईन असलेल्या लोकांमुळे क्वारंटाईनची वाढती संख्या लक्षात घेता शहरात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. शेवटी याला मनपा प्रशासनच जबाबदार असणार आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या नियंत्रणासाठी महापौर आणि आयुक्त हे मिळून काम करीत असल्याचे चित्र नागरिकांपुढे जाणे आवश्यक होते. परंतु ते होताना दिसून येत नाही आणि नजीकच्या काळात थांबेल असेही दिसत नाही, असा सूचक इशाराही जोशी यांनी मुंढे यांना दिला आहे.
मुंढेंना नागपुरात तीन महिनेही झाले नाहीत
‘राजकारण करण्याची वेळ नाही,’ या वक्तव्याबाबत महापौरांनी आक्षेप घेत खेद व्यक्त केला. ‘मी या शहरात जन्मलो, या शहरानेच मला मोठे केले आणि या शहरातच मी मरणार. तुम्हाला तर या शहरात येऊन ३ महिनेही पूर्ण झाले नाहीत. तेव्हा मी आपणाशी राजकारण का करावे, असा सवालही जोशी यांनी उपस्थित केला आहे.