दिव्यांगांनी रोखले महापौरांचे वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:12 AM2021-08-14T04:12:38+5:302021-08-14T04:12:38+5:30
नागपूर : अतिक्रमण कारवाई दरम्यान दिव्यांगांची १५ दुकाने तोडण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांगांनी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या वाहनाला ...
नागपूर : अतिक्रमण कारवाई दरम्यान दिव्यांगांची १५ दुकाने तोडण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांगांनी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या वाहनाला घेराव घातला. त्यांच्या कक्षात धरण्यावर बसले. ३ तास मनपा मुख्यालयात त्यांचे आंदोलन सुरू होते.
दुपारी १ वाजता मुख्यालयात पोहोचलेल्या आंदोलकांनी आपल्या ट्रायसिकल महापौरांच्या वाहनाच्या सभोवताली पार्क केल्या. त्यानंतर अतिक्रमण कारवाईच्या विरोधात नारे दिले. विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे अध्यक्ष गिरीधर भजभुजे व उपाध्यक्ष सुखदेव दुधलकर यांनी सांगितले महापालिका दिव्यांगासाठी विविध योजना राबविते. पण महापौर दिव्यांगासोबत व्यवस्थित बोलत सुद्धा नाही. अतिक्रमण कारवाईच्या संदर्भात आम्ही महापौरांना भेटलो असता त्यांनी तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ मिळत असल्याचे सांगून परत पाठविले. महापौर प्रत्येकवेळी खोटे आश्वासन देत आहेत.
दिव्यांगांच्या आंदोलनाला आवरण्यासाठी पोलीस पोहोचले होते. त्यानंतर महापौरांनी आंदोलकांशी चर्चा करून योग्य मदत करण्याचा विश्वास दिला. त्यांनी दिव्यांगासाठी ७.५ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती दिली. महापौरांनी दिव्यांगांच्या मागणीबाबत पालकमंत्र्यांशी बैठक करण्याचा सल्ला दिव्यांगांना दिला.