मनपाच्या वेबसाईटवर दटके महापौर !
By Admin | Published: March 28, 2017 01:47 AM2017-03-28T01:47:57+5:302017-03-28T01:47:57+5:30
पारदर्शी कारभारासोबतच महापालिकेला स्मार्ट बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात आहे.
कसा होणार हायटेक बदल ? : बदल्यानंतरही अधिकाऱ्यांची नावे कायम
नागपूर : पारदर्शी कारभारासोबतच महापालिकेला स्मार्ट बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात आहे. परंतु महापालिके ची अधिकृत वेबसाईट बघितल्यास वेबसाईटच्या मुखपृष्ठावर अजूनही प्रवीण दटके हेच महापौर आहेत. तसेच अधिकाऱ्यांच्या नावांच्या यादीत एक अपर आयुक्त व एक उपायुक्त यांची नावे नाहीत. मात्र बदली झालेल्या अतिरिक्त आयुक्तांच्या नावाचा यात समावेश आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपाला विक्रमी बहुमत मिळाले. नंदा जिचकार महापौरपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. परंतु वेबसाईटच्या ब्लॉगमध्ये महापौर म्हणून अद्याप प्रवीण दटके यांचे छायाचित्र आहे. अपडेट कॉलममध्ये ही वेबसाईट २७ मार्च २०१७ रोजी अपडेट करण्यात आली आहे. वास्तविक महापालिका निवडणुकीच्या कालावधीत वेबसाईटवरून प्रवीण दटके यांचे छायचित्र हटविण्यात आले होते. आता पुन्हा त्यांचे छायाचित्र टाकण्यात आले आहे.
यासंदर्भात महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर काहीवेळात मुखपृष्ठावरून दटके यांचे छायाचित्र बेपत्ता झाले. परंतु विद्यमान महापौर नंदा जिचकार यांचे छायाचित्र अपलोड करण्यात आलेले नाही. तसेच अधिकाऱ्यांची नावे व क्रमांकाची सूची अपडेट करण्यात आलेली नाही.
महापालिकेत अपर आयुक्तांची तीन पदे आहेत. परंतु यादीत रवींद्र कुंभारे यांच्या नावाचा समावेश नाही. रामनाथ सोनवणे व रिजवान सिद्दीकी यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच दोन उपायुक्त आहेत. परंतु यात रंजना लाडे यांच्या नावाचा समावेश असून रवींद्र देवतळे यांच्या नावाचा समावेश नाही. मात्र गेल्या सहा महिन्यापूर्वी बदली झालेले उपायुक्त रवींद्र भुसारी व पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेले कार्यकारी अभियंता श्याम चव्हाण यांची नावे अद्याप यादीत आहेत. महापालिकेची वेबसाईट अपडेट ठेवण्याची जबाबदारी आयटी क्रॉप्ट यांच्याकडे दिली आहे.(प्रतिनिधी)
सहायक आयुक्त जुन्याच झोनमध्ये
महापालिकेच्या १० झोनमधील सहायक आयुक्तांचे गेल्या काही महिन्यापूर्वी झोन बदलविण्यात आले. महेश धामेचा यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु वेबसाईटवर ते मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त आहेत. तसेच इतर सहायक आयुक्तांची चुकीची माहिती दर्शविण्यात आली आहे.