धक्का लागल्याच्या कारणावरून मेयोच्या उपअधिक्षकांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:41+5:302021-09-08T04:12:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांनी धक्का लागल्याच्या मुद्द्यावरून मेयो रुग्णालयाचे उपअधिक्षक डॉ. सागर पांडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांनी धक्का लागल्याच्या मुद्द्यावरून मेयो रुग्णालयाचे उपअधिक्षक डॉ. सागर पांडे यांना मारहाण केली. गणेशपेठेच्या गंजीपेठेत झालेल्या या मारहाणीत पांडे जखमी झाले आहेत. गणेशपेठ पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे.
तन्मय अजय अहेर (इमामवाडा), ओम रतन गिरीपुंजे (रेशीमबाग) अशी आरोपींची नावे आहेत. ३८ वर्षीय डॉ. सागर पांडे हे गंजीपेठ येथील टाटा पारसी शाळेजवळ राहतात. त्यांच्या शेजारीच अल्पवयीन आरोपी राहतो. मंगळवारी रात्री आरोपीचा वाढदिवस होता व रात्री १२.१५ वाजता सहकाऱ्यांसह केक कापून नाचत होता. जवळच डॉ. पांडे यांची कार पार्क केली होती. ते कारमधून काही आवश्यक सामान काढण्यासाठी आले असता नाचणाऱ्या आरोपींचा त्यांना धक्का लागला. पांडे यांनी त्यांना ‘दिसत नाही का’ असे म्हणत रस्त्यावर नाच न करण्याचा सल्ला दिला. यावरून संतप्त झालेल्या आरोपींनी शिवीगाळ करत पांडे यांच्यावर हल्ला केला. मारहाणीत पांडे यांच्या नाकावर जोरात प्रहार केला. पांडे यांनी तात्काळ गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा नोंदवत तन्मय व ओमला अटक केली. अल्पवयीन आरोपीला सूचनापत्र देऊन सोडण्यात आले आहे.