मेयोत पार्किंगचा ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:15 AM2017-10-22T01:15:33+5:302017-10-22T01:15:44+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये गाडी उभी ठेवली नसतानाही पैसे मोजावे लागत आहेत. स्टॅण्ड संचालकांच्या या जाचाचा रुग्णांच्या नातेवाईकांना मात्र फटका बसतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये गाडी उभी ठेवली नसतानाही पैसे मोजावे लागत आहेत. स्टॅण्ड संचालकांच्या या जाचाचा रुग्णांच्या नातेवाईकांना मात्र फटका बसतो आहे.
याशिवाय जे स्टॅण्डवर गाडी नसताना पैसे देण्यास विरोध दर्शवितात त्यांना मेयोत नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यासंदर्भात मेयो प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या जात असतानाही प्रशासनाचे मात्र यावर मौन आहे.
काही वर्षांपूर्वी मेयोत वाहनांच्या पार्किंगसाठी स्टॅण्ड होते. त्याहीवेळी रुग्णांच्या नातेवाईकांना अशा जाचाला बळी पडावे लागले होते. मात्र याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्याने ते बंद करण्यात आले होते. आता यावेळी त्याच स्टॅण्ड संचालकांना मेयो प्रशासनाने कंत्राट दिले आहे. मात्र यावेळीही गतवेळसारखीच स्थिती येथे उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मेयो रुग्णालयाच्या नवीन ओपीडीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील जागा पार्किंगसाठी तात्पुरती निश्चित करण्यात आली आहे. मेयो प्रशासनानुसार ही जागाही नि:शुल्क पार्किंगसाठी आहे. मात्र येथे नो पार्किंगचा फलक लावण्यात आला आहे. या ठिकाणी वाहनांचे पार्किंग करण्यासाठी स्टॅण्ड संचालक नागरिकांना विरोध करतात.
रस्त्यावर वाहन उभे राहिल्याने वाहतुकीची कोंडी होते. ही समस्या दूर व्हावी यासाठी स्कूटर स्टॅण्डची निविदा काढण्यात आली. स्टॅण्ड संचालकांना पार्किंग स्टॅण्डसाठी चार जागा देण्यात आल्या आहेत. या जागा सोडल्यास तर मेयोत इतर कुठेही पार्किंग शुल्क आकारता येत नाही. संबंधित स्टॅण्ड संचालकाच्या असभ्य वागणुकीबाबत तक्रारी आहेत. यावर निश्चितच तोडगा काढला जाईल.
- डॉ.सागर पांडे,जनसंपर्क अधिकारी, मेयो
मेयोत विकास कामे झाल्याने येथे पार्किंगची व्यवस्थाही नि:शुल्क असणे आवश्यकच आहे. यासाठी आवश्यक प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. खासगी स्टॅण्ड संचालकांमुळे होणाºया त्रासाबाबत प्रशासनाशी लवकरच चर्चा केली जाईल.
- आ.विकास कुंभारे