ट्रेडिंगचा भुलभुलय्या: यूपी, बंगालमधून घेतले जातात ‘सीमकार्ड्स’ तर भाड्याने घेतली जातात बँक खाती
By योगेश पांडे | Published: May 21, 2024 12:11 AM2024-05-21T00:11:10+5:302024-05-21T00:11:36+5:30
Nagpur: ‘प्रोफेसर गॅंग’कडून प्रामुख्याने व्हॉट्सअप व टेलिग्रामच्या माध्यमातून हा शेकडो कोटींचा गोरखधंदा चालतो. यासाठी लागणारी बहुतांश सीम कार्ड्स उत्तर प्रदेश व बंगालसारख्या राज्यांमधून मिळविण्यात येतात. विशेषत: गरीब किंवा निरक्षर नागरिकांची कागदपत्रे मिळवून त्यांच्या नावावरदेखील सीमकार्ड्स घेण्याचे प्रकार वाढले आहेत.
- योगेश पांडे
नागपूर : ‘प्रोफेसर गॅंग’कडून प्रामुख्याने व्हॉट्सअप व टेलिग्रामच्या माध्यमातून हा शेकडो कोटींचा गोरखधंदा चालतो. यासाठी लागणारी बहुतांश सीम कार्ड्स उत्तर प्रदेश व बंगालसारख्या राज्यांमधून मिळविण्यात येतात. विशेषत: गरीब किंवा निरक्षर नागरिकांची कागदपत्रे मिळवून त्यांच्या नावावरदेखील सीमकार्ड्स घेण्याचे प्रकार वाढले आहेत. याशिवाय बॅंकेतील पैसे फिरविण्यासाठी वापरण्यात येणारी शेकडो बॅंक खाती तर चक्क भाड्याने घेतली जातात.
‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रवेश मिळविलेल्या ‘(ए ३६६) हाय क्वॉलिटी स्टॉक ग्रुप’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहाहून अधिक ॲडमिन्स होते. त्यात तथाकथित आर्यन रेड्डी, देविका शर्मा यांचादेखील समावेश होता. मात्र त्यांचे मोबाईल क्रमांक पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश या राज्यांमधील होते. टोळीतील अनेक सदस्यांचे मोबाईल क्रमांक उत्तरप्रदेशमधीलच असल्याची बाब समोर आली. ‘लोकमत’शी संपर्क केलेल्या पिडीत गुंतवणूकदारांनी ज्यावेळी पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हा हे सर्व मोबाईल क्रमांक स्वीच ऑफ असल्याचे निघाले. झेरॉक्स दुकानदारांशी संगमनत करून या टोळीचे सदस्य कागदपत्रे मिळवतात व त्याच्या आधारावर सीम कार्ड्स विकत घेण्यात येतात. त्या माध्यमातून हे पूर्ण रॅकेट संचालित करण्यात येते.
तंत्रज्ञानाचा असादेखील उपयोग, मोबाईल स्वीचऑफ - व्हॉट्सअप मात्र सुरू
आरोपींकडून व्हॉट्सअपमधील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. विविध लॅपटॉप्स व संगणकावर व्हॉट्सअप वेबच्या माध्यमातून व्हॉट्सअप सुरू करण्यात येते. ओटीपी सीम कार्डच्या मोबाईलवर आल्यानंतर काही वेळाने सीम कार्ड मोबाईलमधून बाहेर काढण्यात येते. त्यानंतर केवळ लॅपटॉप-संगणकाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांशी संवाद साधण्यात येतो. आरोपी एकाच मोबाईलमध्ये शेकडो सीमकार्ड्स संचालित करून हे रॅकेट चालवतात.
टोळीत उच्चशिक्षितांचादेखील समावेश
या गॅंगमध्ये सुरुवातीला शेअर मार्केटचे अद्ययावत ज्ञान देण्यात येते व कुठल्या शेअरचे भाव वधारेल हेदेखील अचूकपणे सांगण्यात येते. यासाठी वित्तीय क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले मात्र गुन्हेगारी वृत्ती असलेल्यांची मदत घेण्यात येते. याशिवाय तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान असलेले आरोपीदेखील टोळीत असतात. काही आरोपी देशाच्या बाहेर बसून टोळीचे रॅकेट संचालित करतात. ‘(ए ३६६) हाय क्वॉलिटी स्टॉक ग्रुप’ या व्हॉट्सॲपमधील दोन सदस्य युनायटेड किंगडम व दुबईतील होते. त्यांच्या मोबाईल क्रमाकांसमोर त्या देशांचा कोड होता. या देशांसोबतच अशा टोळ्यांचे सदस्य नेपाळ व इतर देशांतूनदेखील रॅकेट संचालित करतात.
५० हजार ते दीड लाखात बॅंक खाते
प्रोसेसर गॅंगकडून शेकडो बॅंक खाती संचालित करण्यात येत असल्याची बाब लोकमतने उघडकीस आणली होती. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक खाती भाड्याने घेण्यात येतात. जयपूरमधील एका गुन्ह्यात तर दोन आरोपींनी ५०-५० हजारांत बॅंक खाती सायबर गुन्हेगारांना सोपविली होती. त्यातून पिडीतांकडून उकळलेले पैसे इकडून तिकडे करण्याचा प्रकार सुरू होता. यात काही खाजगी बॅंकांच्या कर्मचाऱ्यांचीदेखील मदत घेण्यात येते. जयपूरमधील प्रकरणात तर बॅंक कर्मचाऱ्यालादेखील अटक करण्यात आली आहे.
बॅंक खातेदारांना माहिती नाही
गॅंगचे सदस्य ग्रामीण भागातील गरीब लोकांना गाठून त्यांचे बॅंक खाते उघडून घेतात व त्या बदल्यात त्यांना दरमहा काही पैसे देण्याचे आमिष दाखवितात. पासबुक व बॅंकेचे सर्व दस्तावेज गॅंगच्या एजंट्सकडे असतात. त्यातून दररोज लाखो-कोट्यावधी वळविले जातात. मात्र मूळ बॅंक खातेदाराला याची माहितीच नसते. ‘लोकमत’ने या बॅंक खात्याची माहिती काढली असता केरळ, राजस्थान, महाराष्ट्रातील पुणे अशा विविध ठिकाणच्या बॅंक खात्यात गुंतवणूकदारांचे पैसे वळविल्याची बाब समोर आली.
मुंबईतील पत्ता बोगस
नामांकित ‘एमएनसी’च्या नावाने ‘प्रोफेसर गॅंग’ने सुरू केलेल्या ॲपच्या तपशीलांमध्ये पत्ता हा मुंबईतील बीकेसी येथील देण्यात आला होता. प्रत्यक्षात त्या पत्त्यावर कुठलीही फर्म नव्हती. सर्वसाधारणत: गुंतवणूकदार ॲपमधील तपशील पाहत नाहीत. जर कुणी तपशील पाहिलाच तर त्यांच्या समाधानासाठी बीकेसीचा पत्ता देण्यात आला होता. प्रत्यक्षात नमूद केलेले कॉल सेंटर व पत्ता हे सर्व बोगस होते.
(पुढील भागात : ‘प्रोफेसर गॅंग’ म्हणजे हिमनगाचे टोक, काम एक-नाव अनेक...शेकडो टोळ्यांची नजर भारतीयांच्या पैशांवर)