शेतकरी पुत्राची प्रेरणादायी यशोगाथा, कोतेवाड्यात साकारला हायटेक दूध प्रक्रिया प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 06:04 PM2022-01-02T18:04:52+5:302022-01-02T18:14:52+5:30

शहरात नोकरीच्या मागे न लागता शेतकरी कुटुंबात जन्माला आल्याचे सार्थक व्हावे व मी शेतकऱ्यांसाठी काही देणं लागतो या उद्देशाने त्याने कोतेवाडा येथे प्रकल्प उभारला.

MBA Mayur launches high-tech milk processing project in Kotewada | शेतकरी पुत्राची प्रेरणादायी यशोगाथा, कोतेवाड्यात साकारला हायटेक दूध प्रक्रिया प्रकल्प

शेतकरी पुत्राची प्रेरणादायी यशोगाथा, कोतेवाड्यात साकारला हायटेक दूध प्रक्रिया प्रकल्प

googlenewsNext
ठळक मुद्देलोकसहभागाचे बळ

मधुसूदन चरपे

नागपूर : 'उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती' असे म्हटले जाते. किंबहुना तशी मानसिकता समाजात आहे मात्र कोविड काळात अनेकांचा रोजगार बुडाला. परिणामी शहरात रोजगार नसल्याने मोठया प्रमाणावर तरुण मूळ गावी परतले. काही छोट्या मोठ्या व्यवसायाकडे वळले. या दरम्यान गुमगावनजीकच्या कोलेवाडा येथील शेतकरी पुत्राने स्व:ताला आणि इतरांनाही आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर कसे होता येईल याचा ध्यास घेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आगळा-वेगळा मार्ग अवलंबिला.

हेलसिंग दूध डेअरी आणि दूध प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी करून त्याने एक आदर्श निर्माण केला. आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या नाव मयूर अनील फुलकर आहे. बी.एस्सी (बायोटेक्नोलोजी) नंतर मयूरने एम.बी.ए. केले. शहरात नोकरीच्या मागे न लागता शेतकरी कुटुंबात जन्माला आल्याचे सार्थक व्हावे व मी शेतकऱ्यांसाठी काही देणं लागतो या उद्देशाने त्याने कोतेवाडा येथे प्रकल्प उभारला.

गत दोन वर्षापासून कोविडमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुग्ध व्यवसायासंदर्भात त्यांच्यात जनजागृती व्हावी या महत्वकांक्षेने प्रेरित होऊन मयूरने या प्रकल्पाची निवड केली. प्रकल्पाच्या उभारणीसाठी परिवार, मित्रमंडळी, लोकसहभाग आणि बँकेद्वारे अर्थसहाय्य लाभले आहे. प्रकल्प उभारणीसाठी लागणारे प्रशिक्षण नागपूर येथील उद्योगभवन येथे झाले.

राजुरा (जि. अहमदनगर) येथील गणेश दुग्ध सहकारी संस्थेचे अध्यक्ष गोविंदरावजी औटी, कोतेवाडाचे माजी सरपंच रवींद्र आष्टणकर यांचा सिंहाचा वाटा मयूरला प्रकल्प उभारणीसाठी लाभला आहे.

असा आहे प्रकल्प

  • या प्रकल्पात दररोज पाच हजार लिटर दुधाचे उद्दिष्ट असून, हे दूध परिसरातील शेतकऱ्यांकडून संकलित केले जाणार आहे. या प्रकल्पातून सुमारे २०० ते २५० शेतकरी व तांत्रिक विभागात सुमारे २५ लोकांना रोजगार मिळणार आहे.
  • या प्रकल्पात दुधापासून दही, श्रीखंड, पनीर, खोवा, क्रीम, तूप आदी दुग्धजन्य उत्पादने हॉटेल, घरगुती ग्राहक आणि ऑनलाईन माध्यमातून विक्री केली जाणार आहे.
  • या प्रकल्पात अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसविली असून दूध पाश्चरायझर, दूध होमोजेनाईज, क्रीम सेपरेटर, अत्याधुनिक बॉयलर, फास्ट चिलिंग युनिट आणि पदार्थ जास्त वेळ टिकून राहण्यासाठी ॲडव्हान्स चिलिंग रूमची निर्मिती करण्यात आली असून, व्हॅक्युम पॅकिंग मशीन तसेच आरो फिल्टर मशीनही बसविण्यात आली आहे.

 

थेट शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी या दुग्ध प्रकल्पाची उभारणी केली आहे. कर्जाच्या दुष्टचक्रातून शेतकरी बाहेर पडून आत्महत्या थांबाव्यात, अशी प्रणाली राबविण्याचे ध्येय उराशी बाळगून या प्रकल्पाची निर्मिती केली आहे.

- मयूर फुलकर, दूध प्रक्रिया प्रकल्प निर्माता

Web Title: MBA Mayur launches high-tech milk processing project in Kotewada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.