एमबीए विद्यार्थी सायबर ठगांच्या जाळ्यात, क्रिप्टोच्या नादात गमावले २३ लाख
By योगेश पांडे | Published: April 9, 2024 07:02 PM2024-04-09T19:02:21+5:302024-04-09T19:02:36+5:30
२० वेळा ट्रान्सफर केले पैसे : सुरुवातीला मिळालेल्या चारशे रुपयांच्या नफ्यावरून ठेवला विश्वास
नागपूर : सायबर ठगांनी एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला जाळ्यात ओढले व त्याला तब्बल २३ लाख रुपयांचा गंडा घातला. क्रिप्टोकरंसीमध्ये गुंतवणूकीच्या नावावर आरोपींनी अगोदर त्याला चारशे रुपयांचा नफा दिला व त्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवत त्याने २० वेळा त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मुळचा पश्चिम बंगालमधील हुगली येथील असलेला हा विद्यार्थी सिम्बॉयसिसमध्ये एमबीएचे शिक्षण घेत आहे. त्याला नोव्हेंबर २०२३ मध्ये व्हॉट्सअपवर पार्ट टाईम जॉबबाबत मॅसेज आला. समोरील व्यक्तीने त्याला क्रिप्टोकरंसीत गुंतवणूकीत रस आहे का अशी विचारणा केली. विद्यार्थ्याने होकार दिल्यावर त्याला हजार रुपये गुंतवायला सांगितले. त्यावर त्याला चारशे रुपयांचा नफा देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्याचा विश्वास वाढला. त्याने सायबर गुन्हेगारांच्या सांगण्यावरून लाखो रुपये त्यांच्या खात्यात वळते केले. मात्र गुन्हेगारांकडून् त्याला दरवेळी टास्क पूर्ण करण्यासाठी आणखी पैसे जमा करावे लागतील असे सांगण्यात आले. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्याने अगदी मित्रांकडूनदेखील पैसे उधार घेतले. मित्रांच्याच खात्यातून गुन्हेगारांच्या खात्यात पैसे वळते केले. त्याने अशा पद्धतीने २३ लाख ४ हजार रुपये गुंतविले. मात्र आरोपींना त्याला खाते फ्रीज झाले असून आणखी पैसे जमा करावे लागतील असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे विद्यार्थ्याच्या लक्षात आले. त्याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.