एमबीसीसीएसमध्ये प्रवेशाच्या नावाखाली ८ लाखांची फसवणूक
By योगेश पांडे | Published: August 24, 2023 06:05 PM2023-08-24T18:05:27+5:302023-08-24T18:08:07+5:30
आणखी एक वैद्यकीय प्रवेशाचे रॅकेट ? : कन्सल्टन्सी सुरू करून गोरखधंदा
नागपूर : एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली एका कन्सल्टन्सीच्या माध्यमातून एका फार्मसी मालकाची ८ लाखांनी फसवणूक करण्यात आली. यामागे वैद्यकीय प्रवेशाचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील संदीप बंडावार (५३) असे फसवणूक झालेल्या फार्मसी मालकाचे नाव आहे. त्यांचा मुलाला परदेशातून एमबीबीएसचे शिक्षण घ्यायचे होते. २०१७ साली त्यांना नागपुरात इन्फिनिटी एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेश होतात अशी माहिती मिळाली. त्यांनी तेथे जाऊन रवी राजेश बोरकर (दयालू सोसायटी, जरीपटका) याची भेट घेतली. त्यांच्यात चर्चा झाली व नंतर रवी संदीप यांना चामोर्शीत जाऊन भेटला. १६ लाखांत प्रवेश होईल व त्यातच पाच वर्षांचे शिक्षण होईल, असा दावा रवीने केला.
संदीप यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याला चेक तसेच रोखीच्या माध्यमातून ८ लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर रवीने प्रवेशाबाबत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने त्यांची भेट घेण्याचेच टाळले. संदीप अनेकदा त्याच्या घरी गेले. मात्र दरवेळी तो बाहेर असल्याचेच कारण सांगण्यात यायचे. त्यांच्या मुलाचा प्रवेश अखेरपर्यंत झालाच नाही. अखेर संदीप यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी रवीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरात उघडकीस आले होते मोठे रॅकेट
तीन वर्षांअगोदर नागपुरात एमबीबीएस प्रवेशाचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. सीबीआयने कारवाई करत नागपुरातील परिमल कोतपल्लीवार याच्या संस्थेवर छापेदेखील टाकले होते. नीटमध्ये कमी गुण मिळाल्यानंतर अनेक पालक विद्यार्थ्यांचा प्रवेश व्हावा यासाठी पैसे मोजायला तयार असतात. यातूनच अनेकदा त्यांची फसवणूक करण्यात येते. नागपुरातदेखील विशिष्ट पॅकेजमध्ये वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याचे दावे काही खाजगी संस्थांकडून करण्यात येतात हे विशेष.