‘१००’ नंबरीसमोर एमबीबीएस विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:34 PM2018-12-10T23:34:50+5:302018-12-10T23:38:20+5:30
‘सायलन्स झोन’मध्ये मोडणाऱ्या मेडिकलच्या परिसरातच एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी फटाके फोडले, आरडाओरड करीत परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीवर तेथे बाजूलाच गाडीत बसून असलेले पोलीस मूकदर्शक बनले. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देताच त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी १०० नंबर डायल करण्याचा अजब सल्ला दिला. या कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरणाचा प्रयत्न करताच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गुजर यांनी मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. चीड आणणाऱ्या या घटनेवरून पुन्हा एकदा पोलिसांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सायलन्स झोन’मध्ये मोडणाऱ्या मेडिकलच्या परिसरातच एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी फटाके फोडले, आरडाओरड करीत परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीवर तेथे बाजूलाच गाडीत बसून असलेले पोलीस मूकदर्शक बनले. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देताच त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी १०० नंबर डायल करण्याचा अजब सल्ला दिला. या कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरणाचा प्रयत्न करताच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गुजर यांनी मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. चीड आणणाऱ्या या घटनेवरून पुन्हा एकदा पोलिसांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सोमवारी एमबीबीएस प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचा शेवटचा पेपर होता. दुपारी १ वाजताच्या सुमारास पेपर सुटताच विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर आरडाओरड करणे सुरू केले. फटाक्यांची लड फोडली. तेथून ५० ते १०० विद्यार्थी दुचाकीवर स्वार होऊन ‘ई-लायब्ररी’समोर आले. नारेबाजी, हुल्लडबाजी करीत सुतळी बॉम्ब फोडणे सुरू केले. मेडिकलच्या परिसरात समाजविघातकांवर वचक बसविण्यासासाठी गस्त घालणारे ‘एमएच ३१ डीझेड ०५१९’ पोलीस वाहन जवळच उभे होते. बºयाच वेळापर्यंत पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे पाहत तिथे उपस्थित ‘लोकमत’प्रतिनिधींनी त्यांना हे ‘सायलेन्स झोन’आहे, विद्यार्थ्यांना थांबवा, अशी विनंती केली. यावर पोलिसांनी दखल घेणे टाळून ‘१००’ क्रमांकावर फोन करण्याचा सल्ला दिला. त्यांच्याकडून तक्रार आल्यावरच आम्ही कारवाई करू, असे उत्तर देऊन हात वर केले. ही घडामोड मोबाईलमध्ये टिपून घेत असताना वाहनामधून पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गुजर धावून आले. त्यांनी मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. ‘लोकमत’ प्रतिनिधी असल्याची ओळख दिल्यावर वाद घातला. विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यास तयार नव्हते. प्रतिनिधी निघून जात असताना पाहून पोलीस व्हॅन विद्यार्थ्यांच्या दिशेने निघाली; मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांचा उन्माद सुरूच होता.
पोलीस गुन्हा घडण्याची वाट पाहणार का?
पोलिसांसमोर गुन्हा घडत असताना, पोलिसच जर १०० क्रमांकावर तक्रार करा, नंतर आम्ही कारवाई करतो, अशी भूमिका घेत असतील तर गुन्हेगारांवर वचक कसा बसणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीवरून अनेक वरिष्ठ डॉक्टर, लायब्ररीमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी व रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे पोलिसांसमोर हा प्रकार होऊनही दखल न घेणाऱ्या पोलिसांवरही पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणीही केली.