एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची मानसिक तपासणी होणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:48 AM2018-05-28T11:48:44+5:302018-05-28T11:49:38+5:30
निवासी डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या सुविधा, कामाचा ताण आणि यातून येणारे नैराश्य याला घेऊन राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकने दर वर्षी निवासी डॉक्टरांची मानसिक व शारीरिक तपासणी करण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेजला दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवासी डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या सुविधा, कामाचा ताण आणि यातून येणारे नैराश्य याला घेऊन राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकने दर वर्षी निवासी डॉक्टरांची मानसिक व शारीरिक तपासणी करण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेजला दिल्या आहेत. मात्र, बहुसंख्य कॉलेजेस्चे याकडे दुर्लक्ष झाले असलेतरी याच धर्तीवर एमबीबीएस विद्यार्थ्यांचीही तपासणी होणे व त्याला सर्व कॉलेजेसने गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
शनिवारी अशवंत खोब्रागडे या एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येला घेऊन मेडिकल प्रशासन आतातरी विद्यार्थी व निवासी डॉक्टरांच्या मानसिक तपासणीकडे लक्ष देईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आरोग्याच्या आणि सोयी-सुविधांच्या प्रश्नावरुन राज्यातील निवासी डॉक्टर नेहमी आंदोलन करीत असतात. निवासी डॉक्टरांचे अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. यातच बहुतांश मेडिकलमध्ये वाढलेल्या रुग्णांची संख्या, त्यांच्या सोयींचा अभाव, वाढलेले कामाचे तास, त्यातून येणारा ताण, वेळी-अवेळी झोप यामुळे निवासी डॉक्टर विविध विकारांनी ग्रासले आहेत. अशीच काहीशी स्थिती एमबीबीएस विद्यार्थ्यांची आहे. साडेचार वर्षांचा एमबीबीएस अभ्यासक्रम, घरच्यांच्या वाढलेल्या अपेक्षा, त्यात अभ्यासाचा ताण आणि यातून येणारे नैराश्य यात विद्यार्थी सापडत आहे. दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील एका विद्यार्थ्याचा एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या काही दिवसांतच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. याची दखल त्यावेळचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंधडा यांनी घेतली. त्यांनी महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाला दर सहा महिन्यातून एकदा निवासी डॉक्टरांची मानसिक व शारीरिक आरोग्य तपासणी करण्याची विनंती केली. हा प्रस्ताव वैद्यकीय विद्याशाखेच्या पदव्युत्तर अभ्यासमंडळाच्या बैठकीत चर्चेस्तव ठेवण्यात आला. यात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या निवासी डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात यावे, व प्रत्येक वर्षात आवश्यक्तेनुसार संबंधित निवासी डॉक्टराची शारीरिक व मानसिक आरोग्य तपासणी करावी व त्यास अनुसरून समुपदेशन करण्यात यावे, असा ठराव पारित करण्यात आला. परंतु राज्यभरातील मेडिकल कॉलेजेस्नी उदासीनता दाखवली. मात्र गेल्यावर्षी नागपूर मेडिकलच्याच व्यवसायोपचार विभागातील (आॅक्युपेशनल थेरपी) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी करिश्मा राऊत हिने ४ एप्रिल २०१७ रोजी गळफास लावून केलेली आत्महत्या तर शनिवार २६ मे रोजी एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येला मेडिकल प्रशासन आतातरी गंभीरतेने घेईल व आवश्यक उपाययोजना करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काय होती मुख्य घटना?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (मेडिकल) एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने शनिवारी ‘मॅलिकीआॅन’ नावाचे विष प्राशन करून आत्महत्या केली. ई-लायब्ररीच्या पार्किंगच्या ठिकाणी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. अशवंत अशोकराव खोब्रागडे (२२) रा. भंडारा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
अशवंत हा २०१४ बॅचचा विद्यार्थी होता. महाविद्यालयाच्या वसतिगृहात न राहता हनुमाननगर येथे भाड्याच्या खोलीत राहायचा. सूत्रानूसार, अशवंत हा अभ्यासात बऱ्यापैकी होता. ई-लायब्ररीत तो नियमित अभ्यास करायला यायचा. त्याला खूप जवळचे असे मित्र नव्हते. तो नेहमी एकटा राहायचा. शनिवार २६ मे रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे ई-लायब्ररीत आला. काही वेळ तो ‘लायब्ररी’त बसला. मात्र, नंतर तो कुठे गेला कुणालाच कळले नाही. सायंकाळी जेव्हा काही विद्यार्थी ई-लायब्ररीच्या पार्किंगच्या ठिकाणी उभे होते तेव्हा त्यांना दूर काहीतरी पडून असल्याचे दिसून आले. जेव्हा जवळ जाऊन पाहिले तेव्हा अशवंतचा मृतदेह आढळून आला. काही अंतरावर पांढऱ्या रंगाची विषाची बॉटलही पडून होती.
दर सहा महिन्यांनी समुपदेशन आवश्यकच
एमबीबीएस अभ्यासक्रम हा सोपा अभ्यासक्रम नाही. यातही स्पर्धा आहेच. यामुळे विद्यार्थीच नाही तर निवासी डॉक्टरही तणावात वावरत असतात. म्हणूनच दोन वर्षांपूर्वी महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाला ‘मार्ड’च्यावतीने महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाला विनंती करून सर्व निवासी डॉक्टरांची दर सहा महिन्यांनी मानसिक व शारीरिक तपासणी करण्याची विनंती केली होती, या विनंतीला त्यांनी मान्यता देऊन सर्व मेडिकल कॉलेजेस्ना तशा सूचना दिल्या होत्या. परंतु याचे पालन होतेच असे नाही. यामुळेच आत्महत्येचे प्रमाण वाढतेय. आत्महत्या थांबविण्यासाठी विद्यापीठाच्या सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. सोबतच विद्यार्थ्यांसाठी दर सहा महिन्यांनी कार्यशाळा आयोजित करून यात मानसोपचार तज्ज्ञाकडून समुपदेशन होणेही आवश्यक आहे.
-डॉ. सागर मुंधडा, मानसोपचारतज्ज्ञ