कुख्यात शाहरूख कसाई टोळीवर मकोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 01:24 PM2021-12-24T13:24:56+5:302021-12-24T13:40:08+5:30
हसनबाग परिसरात अनेक वर्षांपासून प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात शाहरूख उर्फ कसाई अकरमच्या टोळीतील गुंडांविरुद्ध पोलिसांनी मकोका लावला.
नागपूर : हसनबाग परिसरात अनेक वर्षांपासून प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात शाहरूख उर्फ कसाई अकरमच्या टोळीतील गुंडांविरुद्ध पोलिसांनी मकोका लावला. या कारवाईमुळे त्या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
२३-२४ ऑक्टोबरच्या रात्री या टोळीतील गुंडांनी इरफान उर्फ भोला रऊफ खान नामक तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला होता. गंभीर जखमी झालेल्या इरफानच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर विक्की, तनवीर, सोहेल आणि फरदीनला अटक करून पोलिसांनी कारागृहात डांबले तर शाहरूख कसाई, नद्दू, गोलू, अयफाज, शहबाज तसेच बशिर फरार आहेत. त्याची चाैकशी करताना परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनी या गुन्हेगारांची कुंडली बाहेर काढली.
ते अनेक वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय असून, त्यांच्यामुळे हसनबागमधील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणाची चाैकशी सहायक आयुक्त गणेश बिराजदार यांच्याकडे सोपविली. त्यांनी ठाणेदार किशोर नगराळेंच्या मदतीने तपास केल्यानंतर अहवाल उपायुक्त हसन यांना सोपविला. त्यानुसार, या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची आवश्यकता उपायुक्त नुरुल हसन यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे नोंदवली. आयुक्तांनी त्याला मान्यता देताच गुरुवारी या टोळीवर मकोका लावण्यात आला.
टोळीतील कुख्यात गुंड
शाहरूख उर्फ कसाई अकरम (वय २४, टोळीचा सूत्रधार), शेख जावेद उर्फ गोलू सय्यद अकरम (वय १९), फरदिन खान फिरोज खान (वय २०), मोहम्मद नदिम उर्फ नद्दू मोहम्मद ईब्राहिम (वय २२) , शेख अहफाज शेख असलम (वय २३), शेख बशिर शेख अकिल (वय १९), शहबाज खान शेर खान, सोहेल अली हसन अली, तनवीर अली हसन अली, फरदीन खान फिरोज खान आणि वसंता फरकुडे अशी मकोका लावण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.