नागपूरच्या जग्गू गोखले टोळीविरुद्ध मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:31 AM2019-01-21T00:31:20+5:302019-01-21T00:32:16+5:30
वारंवार गंभीर गुन्हे करून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात जग्गू ऊर्फ जगदीश विजय गोखले आणि त्याच्या टोळीतील सहा गुंडांवर पोलिसांनी मोक्का लावला आहे. टोळीप्रमुख गोखले अद्यापही फरार आहे, हे विशेष!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वारंवार गंभीर गुन्हे करून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात जग्गू ऊर्फ जगदीश विजय गोखले आणि त्याच्या टोळीतील सहा गुंडांवर पोलिसांनी मोक्का लावला आहे. टोळीप्रमुख गोखले अद्यापही फरार आहे, हे विशेष!
जग्गू ऊर्फ जगदीश विजय गोखले (वय २१, रा. तांडापेठ, पाचपावली), नीतेश प्रकाश माहुरे (वय २१, रा. तांडापेठ, पाचपावली), आकाश चंद्रभान पराते (वय २०, रा. बाळाभाऊपेठ, पाचपावली), मंगेश संजय ठाकरे (वय २२, रा. पाचपावली), शेखर नरेश वर्मा (वय १९, रा. दुर्गा मंदिरजवळ कळमना) आणि आकाश मदन पिल्लेवार (वय २०, दुर्गा मंदिरजवळ कळमना), अशी मोक्का लावलेल्या गुंडांची नावे आहेत. या गुंडांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरी, दरोडा, लुटमार अशाप्रकारचे एकूण २७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या मोकाट वावरण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जानमालाला धोका असल्याचे ध्यानात घेऊन, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे तसेच त्यांच्या सहकाºयांना गोखलेच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. पोटे आणि त्यांच्या सहकाºयांनी त्यानुसार जग्गू गोखले आणि त्याच्या टोळीतील गुंडांचा क्राईम रेकॉर्ड एकत्रित करून त्यांच्याविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव उपायुक्त पोद्दार यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांच्याकडे सादर करण्यात आला. १८ जानेवारीला अतिरिक्त आयुक्त गायकर यांनी त्या प्रस्तावाला मान्यता देऊन गोखले टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायदा १९९९ अन्वये कारवाईचे आदेश दिले. त्यावरून जरीपटका पोलिसांनी गोखले टोळीविरुद्ध मोक्का लावला.
विशेष म्हणजे, या टोळीचा सूत्रधार जग्गू गोखले आणि त्याचा साथीदार आकाश पराते हे दोघे फरार असून, उर्वरित गुंडांना गेल्या आठवड्यातच पोलिसांनी अटक केली होती. फरार गोखले, परातेचा पोलीस शोध घेत आहेत.
एकाच रात्री अनेकांना लुटले
कुख्यात गोखले आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी तीन महिन्यांपूर्वी शहरातील जरीपटका, पाचपावली, गणेशपेठ, शांतिनगर, बेलतरोडी आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांना लुटले होते. शस्त्राचा धाक दाखवून रोख आणि मौल्यवान चीजवस्तू हिसकावून नेल्या होत्या. दोन मोटरसायकलवर पाठलाग करून गोखले आणि त्याच्या पाच साथीदारांनी कडबी चौक ते मंगळवारी रेल्वे पुलावर मोहम्मद नावेद मोहम्मद असलम परवेज (वय १९, रा. आझाद चौक, सदर) याला रोखले. त्याला चाकू लावून त्याच्या जवळचे रोख तीन हजार, मोबाईल तसेच दुचाकीची चावी हिसकावून नेली होती. असलमच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी कलम ३९५, ३४१ भादंवि तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम १४२ अन्वये गुन्हा नोंदविला होता.