कुख्यात आंबेकर टोळीविरुद्ध मकोकाची चार्जशिट दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 10:52 PM2021-02-22T22:52:20+5:302021-02-22T22:54:04+5:30
MCOCA chargesheet notorious Ambekar gang कोट्यवधींची जमीन हडपून ती दुसऱ्याला परस्पर विकल्यानंतर मूळ जमीनमालकाला जीवे मारण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर आणि त्याची टोळी संचलित करणारा त्याचा भाचा नीलेश ज्ञानेश्वर केदार तसेच प्रवीण अशोकराव महाजन आणि नीतेश पुरुषोत्तम माने यांच्याविरुद्ध गुन्हे शाखेने मकोकाचे दोषारोपपत्र (चार्जशिट) न्यायालयात दाखल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोट्यवधींची जमीन हडपून ती दुसऱ्याला परस्पर विकल्यानंतर मूळ जमीनमालकाला जीवे मारण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर आणि त्याची टोळी संचलित करणारा त्याचा भाचा नीलेश ज्ञानेश्वर केदार तसेच प्रवीण अशोकराव महाजन आणि नीतेश पुरुषोत्तम माने यांच्याविरुद्ध गुन्हे शाखेने मकोकाचे दोषारोपपत्र (चार्जशिट) न्यायालयात दाखल केले.
१८६३ पानांच्या या दोषारोपपत्रात आरोपी संतोष आणि त्याच्या टोळीतील गुंडांच्या गुन्हेगारी षडयंत्रांचा खुलासेवार अहवाल लिहिण्यात आला आहे. प्रकरण असे आहे, वर्धमाननगरातील विकास रामविलास जैन (वय ४१) यांनी गुदाम तयार करण्यासाठी कामठीजवळच्या वडोदा येथे १.१६ हेक्टर जमीन विकत घेतली होती. ती पडित असल्याचे पाहून कुख्यात संतोष आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार केले. त्याआधारे ही जमीन जबलपूर जिल्ह्यातील अधारताल गोहलपूर येथील नितेश मानेला विकून ७ फेब्रुवारी २०१५ला आरोपींनी त्याचे विक्रीपत्र करून घेतले. या टोळीने विकास जैन यांच्या नावाने भलताच व्यक्ती विक्रीपत्र करताना उभा केला होता. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर जैन यांनी आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले. दरम्यान, गेल्या वर्षी पोलिसांनी संतोष आंबेकरविरुद्ध गुजरातच्या एका उद्योजकाला फसविल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात घेतले. त्याची आणि त्याच्या टोळीतील गुंडांची कुंडली काढून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मालिका लावली. तेे पाहून जैन यांनीही पोलिसांकडे आपली फिर्याद मांडली. दरम्यान, या गुन्ह्यांचा तपास करून पोलिसांनी संतोषच्या आलिशान गाड्या, लाखोंची रोकड, मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. त्याच्या मुसक्या बांधून त्याला कारागृहात डांबले. त्याचा बंगलाही पोलिसांनी जमीनदोस्त केला.
जैन यांच्या प्रकरणात मकोकाचा गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांनी या प्रकरणाचा तपास करून १८६३ पानांची चार्जशिट न्यायालयात सादर केली.
दोन वर्षातील तिसरा मकोका
एखाच्या गुंडांच्या टोळीविरुद्ध दोन वर्षांत एकाच ठिकाणच्या पोलिसांनी तिसरा मकोका लावण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. आरोपी संतोष आणि टोळीविरुद्ध सोनेगावच्या गुन्ह्यात २०१९ला, सीताबर्डीच्या गुन्ह्यात २०२०ला आणि कामठी प्रकरणात आता २०२१ला मकोका लावण्यात आला आहे.