इराणी गँगवर मकोका : बोगस पोलीस बनून हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 09:58 PM2020-12-21T21:58:03+5:302020-12-21T21:59:50+5:30
MCOCA on Irani gang, nagpur news तोतया (बोगस) पोलीस बनून रस्त्यावर उभे राहणाऱ्या आणि धाक दाखवून महिला-पुरुषांचे दागिने पळवून नेणाऱ्या कुख्यात इराणी टोळीविरुद्ध मकोका लावण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तोतया (बोगस) पोलीस बनून रस्त्यावर उभे राहणाऱ्या आणि धाक दाखवून महिला-पुरुषांचे दागिने पळवून नेणाऱ्या कुख्यात इराणी टोळीविरुद्ध मकोका लावण्यात आला.
हैदर अली युसूफ अली (वय ३०, रा. कामठी), मोहसिन रजा गुलाम रजा (वय ३२, रा. कामठी), युसूफ अली अमीर अली (वय ३७, रा. कामठी), जासिम अली मेहंदी अली (वय ५२, रा. तारखेडा, कामठी), मोहम्मद ओवेस मोहम्मद शाहिद (वय १९, रा. बीबी कॉलनी, कामठी), शब्बीर अली सलीम अली (वय ३३, रा. येरखेडा, कामठी) आणि नादिर जैदी तालिब जैदी (वय ४२, रा. न्यू कामठी) अशी मकोका लावलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
त्यातील शब्बीर आणि नादिर कोल्हापूरजवळच्या कोळंबा कारागृहात तर उर्वरित पाच जण नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. या टोळीने नागपूर, चंद्रपूर, अैारंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, धुळे तसेच दिल्ली आणि वेगवेगळ्या राज्यातील विविध शहरात हैदोस घातला होता. महिला, पुरुष एकटे दिसताच ते त्याला अडवायचे. आपण पोलीस आहोत. समोर लुटमार सुरू असून तुम्ही असे अंगावर दागिने घालून का फिरता, असे म्हणत धाकदपट करायचे. त्या व्यक्तीला अंगावरचे सोन्याचे दागिने काढून पिशवीत अथवा कपड्यात गुंडाळून ठेवा असे सांगायचे. व्यक्तीने दागिने काढताच आरोपी हे दागिने ताब्यात घेऊन पळून जायचे. १३ सप्टेंबर २०२० ला या टोळीने दहीबाजार उड्डाणपुलावर बेबीबाई नेमदेव लक्षणे यांचे अशाच प्रकारे दागिने हिसकावून नेले होते. त्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हापूरमध्ये जाऊन आरोपींच्या मुसक्या बांधल्या. नंतर त्यांचा क्राईम रेकॉर्ड तपासला असता आरोपींविरुद्ध एकूण २६गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. त्याची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या टोळीवर मकोका लावण्याचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांनी या गुन्ह्याचा तपास करून मकोकाची प्रक्रिया पूर्ण केली. शनिवारी त्या संबंधाने न्यायालयात प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि सोमवारी या टोळीवर मकोका लावण्यात आला.
तीन महिन्यातील तिसरा दणका
पोलीस आयुक्त अमितेशकुमार नागपुरात रुजू होऊन तीन महिने झाले. त्यांनी पहिला मकोका कामठी जमीन प्रकरणात कुख्यात संतोष आंबेकरविरुद्ध लावला. दुसरा मकोका बाल्या बिनेकर हत्याकांडात लावण्यात आला तर इराणी टोळीवर लावलेला हा तिसरा मकोका आहे. संतोष आणि इराणी टोळीच्या मकोकाचा तपास सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांनी केला आहे.