नागपुरातील कुख्यात हिरणवार टोळीवर मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:53 PM2018-06-07T23:53:29+5:302018-06-07T23:54:15+5:30
विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात हिरणवार टोळीतील सात गुन्हेगारांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात हिरणवार टोळीतील सात गुन्हेगारांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केली.
काचीपुऱ्यातील चामडीया झोपडपट्टीत राहणारा टोळीचा म्होरक्या शैलेश ऊर्फ बंटी विनोद हिरणवार (वय२४), साहिल ऊर्फ सोनू दिलीप शेंदरे (वय २२), करण प्रशांत शेंडे (वय २४), पवन धीरज हिरणवार (वय २१), शक्ती राजेश यादव (वय २०), सूरज धीरज हिरणवार (वय २४) आणि सौरभ ऊर्फ मोन्या प्रवीण कालसर्पे (वय २४, रा. संभाजी नगर झोपडपट्टी मनमाड, जि. नाशिक) अशी मोक्काची कारवाई झालेल्या गुंडांची नावे आहेत. बुधवारी या संबंधाने पोलीस आयुक्तालयातून आदेश निघाल्यानंतर या गुंडांना कारागृहात डांबण्यात आले.
अनेक वर्षांपासून हिरणवार टोळीतील गुंड गुन्हेगारीत सक्रिय आहेत. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात एकूण १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. २४ मे च्या रात्री बजाजनगर चौकातील बैठक रेस्टॉरंटमध्ये हे गुंड शिरले. तेथे व्यवस्थापक असलेल्या अभिषेक ऊर्फ बबलू राजेश पटले हा आधी हिरणवार टोळीच्या गुंडांसोबत मैत्री ठेवून होता. या गुंडांनी काही दिवसांपूर्वी हिरणवार टोळीतील विरोधी गुंडांसोबत न्यायालय परिसरात बोलताना पटलेला पाहिले. त्यामुळे पटले विरोधी टोळीतील गुंडासोबत जाऊन मिळला असा त्यांना संशय आला. या संशयातून आरोपींनी पटलेसोबत भांडण करून विरोधी गटातील गुंडांसोबत बोलू नको म्हणून विचारणा केली. ते आरडाओरड आणि शिवीगाळ करीत असल्याचे पाहून हॉटेलचे संचालक डोनाल्ड बाबाराव ढोमणे यांनी आरोपींना हटकले. त्यांना हॉटेल बाहेर जाण्यास सांगितले. यामुळे आरोपींनी हॉटेलमधील टेबल, खुर्ची आदी सामानांची तोडफोड करून डोनाल्ड यांच्यावर घातक शस्त्रांनी हल्ला चढवला. त्यात डोनाल्ड गंभीर जखमी झाले होते. बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
फरार, अटक अन् कारागृहाचा रस्ता
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते. ३ जूनला त्यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या आरोपींचा गुन्हेगारी अभिलेख बघून पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर मोक्का लावण्याचे आधीच आदेश दिले. त्यानुसार, कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतर हिरणवार टोळीच्या उपरोक्त गुंडांवर मोक्का लावून त्यांना कारागृहात डांबण्यात आले.