वाडीतील श्रावण गँगवरही मकोका
By admin | Published: February 25, 2016 02:52 AM2016-02-25T02:52:50+5:302016-02-25T02:52:50+5:30
वाडी येथील कुख्यात गुन्हेगार श्रावण धवराड आणि त्याच्या ९ साथीदाराविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली.
आरोपींची संख्या ५० : झोन एकचा रेकॉर्ड
नागपूर : वाडी येथील कुख्यात गुन्हेगार श्रावण धवराड आणि त्याच्या ९ साथीदाराविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. शहर पोलिसांची ही मकोकाची आठवी कारवाई असून झोन एकची चौथी कारवाई आहे. झोन एकचे डीसीपी शैलेश बलकवडे यांनी यासंबंधी माहिती दिली.
श्रावण धवराड याच्यासह त्याचे साथीदार शुभम चरणदास मेंढे (२२) रा. पालकरनगर, नीलेश उर्फ छोटू ज्ञानेश्वर गवई, (२२), दीपक ऊर्फ विट्ठल रवि आठणकर (१९) ,पंकज बलदेव वानखेडे (२१) ,पीयूष अरुणेंद्र सिंह (१९) भीमा विजय बोरकर (२८) योगेश शंकर मैंद (२६) नरेश ऊर्फ नरू रामखिलावन पांडे (२६) सचिन प्रेम सिंह राठोड़ (२१) अशी आरोपीची नावे आहेत.
१५ फेब्रुवारी रोजी श्रावणने साथीदाराच्या मदतीने मरीबा जाधवचा घरात घुसून खून केला होता. मरीबाच्या कुटुंबीयांनाही जखमी केले होते. श्रावण कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्या पत्नीचे मरीबासोबत अनैतिक संबंध होते. दोन वर्षांपूर्वी मरीबा त्याच्या पत्नीला घेऊन पळाला होता. काही दिवसानंतर पत्नी परत आली.
श्रावणच्या दहशतीमुळे मरीबा वाडीत येत नव्हता. श्रावण आपल्याला सोडणार नाही याची याची त्याला कल्पना होती. काही दिवसांपूर्वीच तो घरी परतला होता.
शैलेश बलकवडे यांनी सांगितले की, श्रावण आणि त्याच्या साथीदारांची वाडी परिसरात दहशत होती. त्यांच्या विरुद्ध २५ गुन्हे दाखल आहेत. श्रावणवर सर्वाधिक गुन्हे आहेत. यापूर्वी त्याला तडीपार सुद्धा करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
झोन एकमध्ये सर्वाधिक मकोका
शहरात ८ प्रकरणात मकोकाची कारवाई करण्यात आली. यात ५० गुन्हेगारांना आरोपी करण्यात आले. यापैकी झोन एकमध्ये ४ मकोकाची कारवाई करण्यात आली असून ३० गुन्हेगारांचा समवेश आहे. मकोकाचे दोन प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यावरही तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असेही बलकवडे यांनी सांगितले.