दुकानदाराला फसविण्यासाठी दुकानात ठेवली एमडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:07 AM2020-12-07T04:07:15+5:302020-12-07T04:07:15+5:30
नागपूर : एका युवकाला एमडीच्या तस्करीत फसविण्यासाठी केलेल्या प्लॅनिंगमध्ये आरोपीच अडकल्याची घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या ...
नागपूर : एका युवकाला एमडीच्या तस्करीत फसविण्यासाठी केलेल्या प्लॅनिंगमध्ये आरोपीच अडकल्याची घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या फसवणुकीत एका युवतीची मदत घेण्यात आली होती. पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने त्या महिलेसह तिला मदत करणाऱ्याला व या प्रकरणातील सूत्रधाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लकडगंज हद्दीतील क्वेटा कॉलनी रोडवर दीपिका टेलिकॉम नावाचे दुकान आहे. या दुकानात एमडी ड्रग्स पावडर असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. पोलिसांनी दुकानाची पाहणी केली असता, दुकानात काहीच मिळाले नाही. दुकानदाराने पोलीस पथकाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले. त्यात पथकाला दुकानाच्या समोर ३.७९ ग्राम एमडी सापडली. हे एमडी पावडर एका महिलेसोबत आलेल्या एका व्यक्तीने ठेवले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली. यात महिलेची माहिती मिळाली. आरोपी महिला लष्करीबाग येथील निकिता राहुल मेश्राम हिला ताब्यात घेतल्यावर चौकशी केली असता, तिच्यासोबत एमडी ठेवणाऱ्या गुरुनानकपुरा येथील मनमीतसिंह हरविंदरसिंह तक्खर याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.
- बग्गाने रचला कट
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या निकिता व मनमीतसिंह यांनी सांगितले की हा कट अरमिंदरसिंह बग्गा याने रचला होता. बग्गाने अन्नीच्या माध्यमातून एमडी मिळवून निकिताला दिली होती. निकिताने मनमीतसिंहच्या मदतीने दीपिका टेलिकॉम या दुकानात एमडी ठेवली. याप्रकरणी पोलिसांनी निकिता, मनमीत यांच्यासह अमरिंदरसिंह बग्गा व अन्नीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. अमरिंदसिंह व अन्नी फरार आहे.
- एका महिलेच्या सतर्कतेमुळे कट उधळला
सूत्रांनी सांगितले की, दुकान मालकाचा मुलगा हिमांशु ठुठेजा हा दुकानात होता. तिथे बग्गाचे साथीदार पोहचले. त्याने हिमांशुचे लक्ष विचलित केले. त्यानंतर सामान घेत असताना काही तरी खाली पाडले. दरम्यान काऊंटरखाली एक पुडी टाकून दिली व ते निघून गेले. ते गेल्यानंतर एका महिलेने दुकानमालक हिमांशु यांना सांगितले की, एका महिलेने काऊंटरखाली काही तरी ठेवले आहे. हिमांशुने काऊंटर काढल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या पावडरची पुडी सापडली. त्याने पुडीला दुकानाच्या बाहेर फेकून दिले. त्यानंतर लगेच पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारला. हिमांशुचा मोबाईल हिसकला, संपूर्ण दुकानाची तपासणी केली. परंतु त्यांना काहीच सापडले नाही.