अडीच लाख मिळताच नागपुरात एमडी तस्कराला सोडले ! शहर पोलीस दलात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 09:08 PM2019-10-21T21:08:53+5:302019-10-21T21:15:16+5:30
घातक अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करूनही त्याच्यावर कारवाई न करता किंवा वरिष्ठांना त्याची माहिती न देता नंदनवन ठाण्यातील पाच पोलिसांनी अर्थलाभ पदरात पडल्यामुळे चुप्पी साधली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घातक अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करूनही त्याच्यावर कारवाई न करता किंवा वरिष्ठांना त्याची माहिती न देता नंदनवन ठाण्यातील पाच पोलिसांनी अर्थलाभ पदरात पडल्यामुळे चुप्पी साधली. मात्र, या प्रकरणाचा बोभाटा झाल्याने मौनीबाबा बनलेल्या या पाचही पोलिसांविरुद्ध त्यांच्याच पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाले. हवलदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबर्ते आणि दिलीप अवगणे अशी या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून, वृत्त लिहिस्तोवर त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शहर पोलीस दलात भूकंपाचे वातावरण निर्माण करणारे हे प्रकरण १४ ऑक्टोबरचे आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत (डीबी स्कॉड) कार्यरत असलेले उपरोक्त पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना जमाल नामक अंमली पदार्थाचा तस्कर दुचाकीवर जाताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एमडी पावडरचे दोन मोठे पॅकेट आढळले. ते तपासत असतानाच जमालने एका पोलिसाच्या हाताला झटका मारून पळ काढला. त्याची शोधाशोध करत पोलीस पथक रमणा मारोती चौकात पोहचले. तेथे ते एका टपरीवर चहा पीत असताना त्यांच्याजवळ जावेद नामक आरोपी आला. ‘साहाब, जमाल का पिछा मत करो. चायपानी ले लो’, असे म्हणत त्याने शंभर आणि पाचशेंच्या नोटांचे बंडल पोलिसांच्या हातात कोंबले. या पाचही पोलिसांनी ते हातात घेत पोलीस ठाणे गाठले आणि या संपूर्ण घडामोडीबाबत मौनीबाबांची भूमीका स्विकारली.
फोनमुळे झाला बोभाटा !
मोठ्या प्रमाणात एमडी पावडर आणि नोटा मिळाल्याने मौनी बाबा बनलेल्या या पाच पोलिसांच्या कसुरीचा भंडाफोड तब्बल ५ दिवसानंतर झाला. एका व्यक्तीने निनावी फोन करून उपरोक्त माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या कानावर घातली. त्यामुळे एसीपी विजय धोपावकर १९ ऑक्टोबरला नंदनवन ठाण्यात पोहचले. त्यांनी ठाणेदार विनायक चव्हाण यांच्यासोबत चर्चा करून डीबी रूम गाठली. त्या रूममध्ये हवलदार सचिन एम्प्रेडीवारचे कपाट तपासले असता त्यात एमडी पावडरचे दोन पॅकेट आणि नोटांचे घबाड आढळले. एसीपी धोपावकर यांनी तेथून २३. ५० ग्राम तसेच १०.५० ग्राम (एकूण ३४ ग्राम) एमडी आणि २ लाख, ४० हजारांची रोकड जप्त केली.
पैशासाठी कर्तव्यकसुरी !
एवढे मोठे एमडी पावडर आणि नोटा घेतल्यानंतर सचिन आणि त्याच्या साथीदारांनी त्या चक्क डीबी रूममध्येच ठेवल्या मात्र त्याबाबत कोणतीही नोंद पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीवर केली नाही. ठाणेदारालाही त्याबाबत कोणतीच कल्पना दिली नाही. कायद्याची जाण असूनही पोलिसांनी हीम कर्तव्यकसुरी वजा गुन्हा केवळ पैश्यासाठी केल्याचा निष्कर्ष निघाल्याने हा चौकशी अहवाल पोलीस आयुक्तांना रविवारी सायंकाळी कळविण्यात आला. त्याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी उपरोक्त पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर, सोमवारी दिवसभर पुन्हा आरोपी पोलीस हवलदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबर्ते आणि दिलीप अवगणे यांचे बयाण नोंदविण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घडामोडीमुळे शहर पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.