सुभाषनगरात सापळा, दुचाकीस्वाराकडून साडेतीन लाखांची ‘एमडी’ जप्त
By योगेश पांडे | Published: March 27, 2023 02:33 PM2023-03-27T14:33:27+5:302023-03-27T14:34:31+5:30
एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद
नागपूर : शहरात ड्रग्ज तस्करांवर नियंत्रण आल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात अंमली पदार्थांचा व्यापार सुरूच आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्रीनंतर सुभाषनगर परिसरात सापळा रचत एका दुचाकीस्वाराला साडेतील लाखांच्या ‘एमडी पावडर’सह अटक केली.
गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला खबऱ्यांच्या माध्यमातून एक व्यक्ती ‘एमडी’ घेऊन जाणार असल्याची ‘टीप’ मिळाली होती. त्यानुसार राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाषनगर येथए रविवारी रात्री ९ वाजता सापळा रचण्यात आला. पहाटे तीन वाजताच्या सुमारास एमएच ४० एजी ७८७६ या क्रमांकावरील दुचाकीने एक व्यक्ती आला. त्याला दुचाकी थांबविण्याचा इशारा केला असता त्याने पळून जायचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ३५ ग्रॅम ‘एमडी पावडर’ आढळून आली.
विजय सुरेश वाघमारे (४०, गोपालनगर तिसरा बसस्टॉप) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. त्याच्याकडून दुचाकीर, मोबाईल असा एकूण ४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या मोबाईलचीदेखील तपासणी करण्यात येत असून त्याला ‘एमडी’ कुठून मिळाली व तो खेप कुठे पोहोचवत होता. तसेच या ‘लिंक’मध्ये आणखी कोण सहभागी आहे याचा शोध घेण्यात येत आहे.