‘एसीबी’मधील मी टु प्रकरण : महिला पोलिसाने दिले ‘व्हॉईस सॅम्पल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:21 PM2019-02-13T22:21:30+5:302019-02-13T22:23:04+5:30
लाचलुचपत विभागाचे निलंबित अधीक्षक प्रद्युम्न पाटील यांच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप लावणाऱ्या महिला शिपायाच्या आवाजाचे नमुने (व्हॉईल सॅम्पल) घेण्यात आले. मंगळवारी प्रकरणाचा तपास करीत असलेले झोन २ चे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या उपस्थितीत पीडित महिला शिपायाच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. ४ डिसेंबरला पाटील यांच्याविरुद्ध सदर ठाण्यात छेडखानी, धमकी देणे आणि बदनामी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाचलुचपत विभागाचे निलंबित अधीक्षक प्रद्युम्न पाटील यांच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप लावणाऱ्या महिला शिपायाच्या आवाजाचे नमुने (व्हॉईल सॅम्पल) घेण्यात आले. मंगळवारी प्रकरणाचा तपास करीत असलेले झोन २ चे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या उपस्थितीत पीडित महिला शिपायाच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. ४ डिसेंबरला पाटील यांच्याविरुद्ध सदर ठाण्यात छेडखानी, धमकी देणे आणि बदनामी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीडित महिला पोलीस शिपाई जानेवारी २०१६ मध्ये ग्रामीण पोलिसात लाच लुचपत विभागात आली होती. ती अविवाहित आहे. मे २०१७ मध्ये पाटील एसीबीत तैनात होते. पाटील यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये महिला पोलीस शिपायास आपल्या कक्षात बोलावले. त्यानंतर तिला त्रास देणे सुरू केले. पाटील तिला व्हॉट्सअप आणि व्हिडीओ कॉल करून त्रास देत होते. आपत्तीजनक गोष्टी करून शरीर सुखाची मागणी करीत होते. तिला अश्लील फोटो काढून पाठविण्यासाठी दबाव टाकत होते. आपली मागणी पूर्ण न केल्यानंतर एसीबीच्या एका अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप लावत बदनाम करून एसीबीमधून मूळ विभागात परत पाठविण्याची धमकी देत होते. त्यानंतरही तिने ऐकले नसल्यामुळे त्यांनी कार्यमुक्त केल्याचा आदेश जारी केला होता. पीडित महिला पोलीस शिपायाने एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांना घटनेची तक्रार केली होती. बर्वे यांच्या निर्देशावर तक्रारीचा तपास विशाखा कमिटीला सोपविण्यात आला. विशाखा कमिटीच्या तपासानंतर ४ फेब्रुवारीला पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापूर्वीच ते फरार झाले होते. त्यांनी न्यायालयातून जामीन मिळविला होता. आठवडाभरापूर्वी पाटील यांना निलंबित करण्यात आले होते. पीडित महिला शिपायाने पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेचे रेकॉर्डिंग केले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग पोलिसांना सोपविले. त्यानंतर हे रेकॉर्डिंग तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यानंतर पीडित महिला पोलिसाच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत.