नागपूर आणि वर्धा स्थानकावर प्रवाशांना माफक दरात जेवण
By नरेश डोंगरे | Published: April 25, 2024 07:57 PM2024-04-25T19:57:02+5:302024-04-25T19:57:14+5:30
२० आणि ५० रुपयांत मिळते जेवण : विदर्भातील अन्य स्थानकांवर लवकरच सुविधा
नागपूर : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या सहकार्याने मध्य रेल्वेकडून प्रवाशांना माफक दरात चांगल्या प्रतिचा नाश्ता आणि जेवण उपलब्ध करून देणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर आणि वर्धा स्थानकावर ही सेवा सुरू करण्यात आली असून लवकरच अन्य स्थानकांवरही ही सेवा-सुविधा सुरू केली जाणार आहे.
उन्हाळ्यात अनेक रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होते. खासकरून जनरल डब्यातील गर्दीत मोठी वाढ होते. हे प्रवासी रेल्वे स्थानकावर किंवा गाड्यांमध्ये मिळेल तो नाश्ता, जेवण घेऊन आपली भूक भागवितात. काही अनधिकृत विक्रेते गर्दी पाहून नाश्ता, खाद्य पदार्थांची किंमत वाढवून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करतात. ते लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त दरात चांगले जेवण आणि नाश्ता उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, केवळ २० रुपयांत आणि ५० रुपयांत नाश्ता तसेच जेवणाचे दोन पर्याय रेल्वेने प्रवाशांना उपलब्ध करून दिले आहे. सध्या नागपूर आणि वर्धा रेल्वे स्थानकांवर हे ऊंटर सुरू करण्यात आले आहे.
कोचच्या खिडक्यांजवळून घेता येणार जेवण
महिला, ज्येष्ठ नागरिकांना नाश्ता, जेवण विकत घेण्यासाठी गाडीतून चढण्या-उतरण्याची कसरत करावी लागू नये म्हणून प्लॅटफॉर्मवरील अनारक्षित डब्यांच्या (सामान्य श्रेणीचे डबे) जवळ हे काउंटर सुरू करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे. अर्थात, खिडकीजवळ असलेल्या या काउंटरवरून प्रवासी त्यांचा नाश्ता, जेवण आणि पाणी खरेदी करू शकतात. दूरवर असलेल्या खाद्य पदार्थांचे स्टॉल शोधण्याची किंवा स्टेशनच्या बाहेर धावपळ करण्याची गरज प्रवाशांना भासणार नाही.
गेल्या वर्षीचा उपक्रम यशस्वी
मध्य रेल्वेने गेल्या वर्षी अशा प्रकारे स्वस्त दरात ठिकठिकाणच्या ५१ स्थानकांवर नाश्ता आणि जेवणाची सुविधा प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे यावेळी मध्य रेल्वेने आता १०० हून अधिक स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाचा आणखी काही स्थानकांवर लवकरच विस्तार करण्याची योजना विचाराधिन असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.