तर नागपूर विद्यापीठ देणार महापुरुषांच्या नावाने पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:37 PM2018-03-22T22:37:22+5:302018-03-22T22:37:45+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध अभ्यासक्रमातील गुणवंतांना सद्यस्थितीत ३४३ पदके पारितोषिके प्रदान करण्यात येतात. अनेक वर्षांपूर्वी दानदात्यांनी जमा केलेल्या अनामत रकमेच्या आधारे आता पदके बनविणे परवडण्याजोगे राहिलेले नाही. त्यामुळे पुढील वर्षीपासून पदकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. परंतु कुठल्याही स्थितीत एकाही महापुरुषाच्या नावे असलेले पदक रद्द होणार नाही. वेळ पडलीच तर विद्यापीठ यासाठी निधीची तरतूद करेल, असे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध अभ्यासक्रमातील गुणवंतांना सद्यस्थितीत ३४३ पदके पारितोषिके प्रदान करण्यात येतात. अनेक वर्षांपूर्वी दानदात्यांनी जमा केलेल्या अनामत रकमेच्या आधारे आता पदके बनविणे परवडण्याजोगे राहिलेले नाही. त्यामुळे पुढील वर्षीपासून पदकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. परंतु कुठल्याही स्थितीत एकाही महापुरुषाच्या नावे असलेले पदक रद्द होणार नाही. वेळ पडलीच तर विद्यापीठ यासाठी निधीची तरतूद करेल, असे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.
नागपूर विद्यापीठात काही दानदात्यांनी अगदी १९३० साली पुरस्कारासाठी निधी दिला होता. त्याकाळी मोठी वाटणारी अनामत रकमेची आताची किंमत फारच कमी आहे. त्या रकमेच्या आधारे दरवर्षी पदकांची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठालाच निधी द्यावा लागत आहे. त्यामुळे विद्यापीठाने दानदात्यांना पत्र लिहिले व आताच्या बाजारभावाच्या हिशेबाने सुधारित रकमेच्या धनादेशाची मागणी केली. जर सुधारित धनादेश देणे शक्य नसेल तर मूळ अनामत रक्कम दानदात्यांचे कुटुंबीय घेऊन जाऊ शकतात, असेदेखील स्पष्ट करण्यात आले.
विद्यापीठाने यासंबंधात ३४३ दानदात्यांना पत्र पाठविले. यातील ३५ जणांनी अतिरिक्त रक्कम भरण्याची तयारी दाखविली आहे. १७ जणांनी अनामत रक्कम परत मागितली आहे. २८ जणांचा विद्यापीठाकडे पत्ताच उपलब्ध नाही तर १०१ जणांची पत्रे परत आली आहेत. उर्वरित दानदात्यांनी विद्यापीठाला अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
विद्यापीठाला अनिच्छेने हे पाऊल उचलावे लागत आहे. मात्र बाजारभाव व मूळ अनामत रकमेवरील व्याज यांची सांगड घालणे कठीण झाले आहे; शिवाय आता करदेखील वाढले आहेत व ठेवींवरील व्याज घटले आहे. त्यामुळे आम्ही दानदात्यांना आवाहन केले आहे, असे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले. परंतु कुठल्याही परिस्थितीत महापुरुषांच्या नावे असलेली पदके-पारितोषिके रद्द होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
पदकांचे समान वाटप व्हावे
नागपूर विद्यापीठात काही अभ्यासक्रमांमधील गुणवंतांना मोठ्या प्रमाणात पदके-पारितोषिके मिळतात. परंतु दानदात्यांनी पुढाकारच घेतला नसल्याने काही अभ्यासक्रमांत एकही पदक किंवा पारितोषिक नाही, अशी स्थिती आहे. गुणवंत विद्यार्थ्यांवर हा एकप्रकारे अन्यायच आहे.पदकांचे समान वाटप व्हावे,अशी विद्यापीठाची भूमिका असून यानंतर येणाऱ्या नवीन दानदात्यांना अशा अभ्यासक्रमांसाठी निधी देण्यासंबंधात आवाहन करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले.