लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची मोलाची भूमिका : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 08:57 PM2019-10-14T20:57:01+5:302019-10-14T20:57:52+5:30
लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची मोलाची भूमिका आहे. प्रसारमाध्यमांनी मतदार जागृतीसाठी प्रशासनाला सहकार्य करून लोकशाही सदृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजवावी असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची मोलाची भूमिका आहे. प्रसारमाध्यमांनी मतदार जागृतीसाठी प्रशासनाला सहकार्य करून लोकशाही सदृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजवावी असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छपत्रपती सभागृहात ते संपादकांसोबत विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात संवाद साधत होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, मतदान करण्यासाठी प्रशासानातर्फे मतदारांना स्वीप व अन्य मतदार जागृतीच्या कार्यक्रमातून आवाहन करण्यात येत आहे. साधारण ७० हजार विद्यार्थ्यांकडून पालकांनी मतदान करावे असे संकल्पपत्रदेखील भरून घेण्यात आले आहे. मतदानासाठी दिव्यांग व्यक्तींना केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बीएलओमार्फत चिठ्ठी वाटप करण्यात येणार आहे. पोस्टाच्या माध्यमातून जलदगतीने पोस्टल बॅलेटचे वाटप करण्यात येईल.
यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वर्तमानपत्रातून मतदारांना आवाहन करणे व विविध संदेशाच्या माध्यमातून संपर्क करण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी १९ हजारांपेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनाही आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल बॅलेट पेपर उपलब्ध करून दिले आहे. कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही अशी प्रशासनाची भूमिका आहे. स्वीप उपक्रमांतर्गत पथनाट्य, महिला बचत गट आदीद्वारे मतदार जागृती करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले. यावेळी विविध वर्तमानपत्राचे संपादक उपस्थित होते.