भाजपच्या दोन माजी नगरसेवकांच्या वादात प्रदेशाध्यक्षांची मध्यस्थी

By गणेश हुड | Published: September 16, 2023 06:41 PM2023-09-16T18:41:45+5:302023-09-16T18:42:45+5:30

बोरकर व कुकडे यांना निवासस्थानी बोलावून घडविला समेट

Mediation of the state president bawankule in the dispute between two former corporators of BJP nagpur politics | भाजपच्या दोन माजी नगरसेवकांच्या वादात प्रदेशाध्यक्षांची मध्यस्थी

भाजपच्या दोन माजी नगरसेवकांच्या वादात प्रदेशाध्यक्षांची मध्यस्थी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे व बाल्या बोरकर यांच्यात महापालिकेच्या परिवहन विभागातील निविदेवरून वाद विकोपाला गेला आहे. बोरकर यांनी परिवहन विभागातील निविदा घोटाळ्याचा जाहीर आरोप केल्याने शहर भाजपात वादळ उठले होते. दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद तात्पुरता शमल्याचे दिसत आहे.

महापालिकेत सलग १५ वर्षे भाजपची सत्ता होती. त्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकावर आरोप केल्याने पक्षाची होत असलेली बदनामी विचारात घेता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी बाल्या बोरकर व बंटी कुकडे या दोघांनाही आपल्या निवासस्थानी बोलावून हा वाद थांबविण्यास सांगितले. त्यानुसार तूर्त हा वाद थांबल्याचे दिसत असले तरी मागील काही वर्षापासून बोरकर व कुकडे यांच्या धुसफूस सुरू आहे. या बैठकीतील चर्चेचा तपशील पुढे आला नाही.

बंटी कुकडे यांची शहर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी नुकतीच शहर कार्यकारिणी जाहीर केली. यामुळे बाल्या बोरकर नाराज होते. त्यांनी महापालिकेच्या परिवहन विभागातील घोटाळा उघड करणार असल्याचे जाहीर केले होते. यावर ते पत्रकार परिषद घेणार होते. परंतु कौटुंबिक कारण पुढे करून त्यांनी ऐनवेळी पत्रकार परिषद रद्द केली. परिवहन विभागातील दोन कर्मचारी बंटी कुकडे यांच्याकडे काम करीत असल्याने तक्रार मनपा आयुक्तांकडे केली. त्यांनी या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्याने बाल्या बोरकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याची तक्रार बोरकर यांनी पोलिसात केली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल केला. यामुळे भाजपात खळबळ उडाली.

परिवहन समितीचे सभापती पद व भाजप शहर अध्यक्षांची नियुक्ती याची किनार या वादाला असल्याची चर्चा आहे. त्यात भाजप कार्यकारिणीत बोरकर यांच्या कार्यकर्त्यांना डावलल्याने हा वाद वाढल्याची चर्चा आहे.

Web Title: Mediation of the state president bawankule in the dispute between two former corporators of BJP nagpur politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा