मेडिकल : सात दिवसात आठ कोटींच्या यंत्र खरेदीला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:52 AM2019-08-21T00:52:15+5:302019-08-21T00:53:18+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या सात दिवसात यंत्र सामुग्रीसाठी ८ कोटी ३१ लाखांच्या खर्चाला शासनाने मंजुरी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या सात दिवसात यंत्र सामुग्रीसाठी ८ कोटी ३१ लाखांच्या खर्चाला शासनाने मंजुरी दिली आहे. या निधीतून ४५ यंत्रांची खरेदी केली जाणार आहे. जिल्हा वार्षिक योजना व जिल्हा खनिज प्रतिष्ठानचा हा निधी आहे.
मेडिकलला दरवर्षी जिल्हा नियोजन समिती व वैद्यकीय शिक्षण विभागाकडून यंत्रसामुग्री खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून ज्या विभागाला यंत्राची गरज आहे त्यांच्या प्रस्तावानुसार यंत्राची खरेदी केली जाते. परंतु गेल्या वर्षी निधी उपलब्ध होऊनही प्रस्तावानुसार फार कमी यंत्र उपलब्ध झाली होती. परंतु यावर्षी एक-एक यंत्र यायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, १३ ते २० ऑगस्ट या दरम्यान यंत्र खरेदीसाठी ८ कोटी ३१ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यात जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी २५ लाखांचा निधी आहे. या निधीतून ‘एअरसील विथ ऑल अॅक्सेसरीज’, ‘व्हॅलिलॅब एफ टी-१० अॅनर्जी प्लॅटफॉर्म’ व ‘एन्कॉर इनस्पायर व्हॅकम अॅसिस्टेड ब्रेस्ट बायोप्सी’ या यंत्राची खरेदी केली जाणार आहे. या वर्षी पहिल्यांदाच जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूरच्यावतीने मोठा निधी मेडिकलला उपलब्ध झाला आहे. यातील ६ कोटी ७२ लाखांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. या निधीतून ३१ व्हेंटिलेटर्ससह १६ विविध यंत्रांची खरेदी केली जाणार आहे. यात एक कोटीच्या ‘अल्ट्रासोनिक फायबर व्हिडीओ ब्रान्कोस्कोप विथ अल्ट्रासाऊंड विथ अल्ट्रासोनिक प्रोसेसर’यंत्राचा समावेश् आहे. या सर्व यंत्र खरेदीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असलीतरी खरेदी प्रक्रियेला वेळ लागणार आहे. परंतु या यंत्रामुळे मेडिकलमधील रुग्णांचा मोठा फायदा होणार आहे.