चार महिन्यात १२७२ रेल्वे प्रवाशांना वैद्यकीय मदत
By नरेश डोंगरे | Published: May 11, 2024 10:52 PM2024-05-11T22:52:20+5:302024-05-11T23:06:18+5:30
रेल्वे प्रशासन : आणीबाणीच्या वेळी वैद्यकीय सुविधेचे नियोजन.
नागपूर : प्रवासादरम्यान किंवा रेल्वे स्थानकावर कुण्या प्रवाशाला तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नियोजन केले आहे. गेल्या चार महिन्यात अशाप्रकारे विविध रेल्वे गाड्या आणि स्थानकांवर १,२७२ प्रवाशांना तत्परतेने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अनेकदा धावत्या गाडीत प्रवाशांना आकस्मिक वैद्यकीय मदतीची गरज भासते. कुण्या गर्भवतीची प्रसूतीची वेळ येते तर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला उच्च रक्तदाब किंवा हृदयविकारासंबंधीच्या मदतीची गरज भासते. अशा वेळी प्रवाशाच्या नातेवाइकांकडून किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रवाशाकडून रेल्वेतील गार्ड, चेकिंग स्टाफ किंवा सरळ सरळ हेल्पलाइन नंबरवर मदत मागितल्यास त्या प्रवाशाला तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केले आहे. आणीबाणीच्या वेळी आरोग्य सेवक अशा प्रवाशांना प्राथमिक उपचार देतात आणि नजीकच्या रेल्वेस्थानकावर डॉक्टर आणि ॲम्बुलन्स तयार ठेवली जाते. त्या स्थानकावर गाडी थांबून तत्काळ हे पथक संबंधित प्रवाशाला खाली उतरवून त्यावर आवश्यक ते उपचार करतात. २०२४ च्या पहिल्या चार महिन्यात अर्थात एप्रिल २०२४ पर्यंत नागपूर विभागाच्या वैद्यकीय पथकाने रेल्वेतील १२७२ प्रवाशांना अशा प्रकारची आवश्यक वैद्यकीय मदत केली आहे.
१३९ वर तत्काळ कॉल करा
धावत्या रेल्वेत कोणत्याही प्रकारची तत्काळ वैद्यकीय मदत हवी असेल तर रेल्वेची हेल्पलाइन नंबर १३९ वर तत्काळ कॉल करावा. त्यामुळे ट्रेनचे लोकेशन ट्रेस करून कुठले स्थानक जवळ आहे आणि प्रवाशाला कशा प्रकारे तात्काळ मदत करता येईल, याचे रेल्वे प्रशासनाकडून नियोजन करण्यात येते. त्या प्रवाशाला त्याच्या कोचमध्येच चेकिंग स्टाफ, गार्ड तातडीने मदत करतात आणि नंतर स्थानकावर आधीच डॉक्टरांचे पथक तैनात असल्यामुळे स्थानकावर गाडी येताच त्या प्रवाशाला तत्काळ मदत मिळते.