सौर ऊर्जेने उजळून निघणार मेडिकल : ६ कोटींचा प्रकल्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 12:48 AM2021-03-07T00:48:45+5:302021-03-07T00:50:51+5:30

Medical Hospital, solar energy मेडिकल प्रशासनाने सौर ऊर्जेचा पर्याय निवडला आहे. प्रकल्पाला जिल्हा नियोजन समितीने जवळपास ६ कोटींचा निधी दिला असून प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे.

Medical to be lit by solar energy: 6 crore project | सौर ऊर्जेने उजळून निघणार मेडिकल : ६ कोटींचा प्रकल्प 

सौर ऊर्जेने उजळून निघणार मेडिकल : ६ कोटींचा प्रकल्प 

Next
ठळक मुद्दे१२६० कि.वॅ. विजेची होणार निर्मिती : महाऊर्जा विभागीय कार्यालयाची तांत्रिक मंजुरी

सुमेध वाघमारे /लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : गेल्या काही वर्षांमध्ये विजेचे दर कमालीचे वाढले आहेत. गरीब रुग्णांसाठी आशेचे किरण ठरलेल्या मेडिकललाही वीजबिलाचे चटके सहन करावे लागत आहेत. यातच विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. यावर मेडिकल प्रशासनाने सौर ऊर्जेचा पर्याय निवडला आहे. प्रकल्पाला जिल्हा नियोजन समितीने जवळपास ६ कोटींचा निधी दिला असून प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. नुकतेच महाऊर्जा विभागीय कार्यालयाच्या पथकाने जागेचे सर्वेक्षण करून तांत्रिक मंजुरीही दिल्याने लवकरच मेडिकल सौर ऊर्जेने उजळून निघणार आहे.

आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून मेडिकलची ओळख आहे. मागील पाच वर्षांत मेडिकलमध्ये नवनवीन विभागाची निर्मिती होऊ घातली आहे. ट्रॉमा केअर सेंटर, अद्ययावत अतिदक्षता विभाग रुग्णसेवेत रुजू झाले आहे. लवकरच मुलांचे वसतिगृह विद्यार्थ्यांच्या सेवेत असणार आहे. तर, भविष्यात कॅन्सर हॉस्पिटल, स्पाईन सेंटर, जेरियाट्रिक सेंटर व इतरही नवीन विभागाचे बांधकाम होणार आहे. यामुळे या विभागांना मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे. सध्याच्या स्थितीत मेडिकलच्या २०० एकर परिसराला प्रकाशमान करण्यासाठी प्रशासनाला दरमहा सुमारे ८०-९० लाख रुपये विजबिलावर खर्च करावे लागत आहे. शासन दरवर्षी मेडिकलला विजेसाठी आठ कोटी रुपयांचे अनुदान देते. परंतु वाढते विभाग, वॉर्ड व यंत्रसामग्रीमुळे खर्च आणि अनुदान यात ताळमेळ बसविणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. तो टाळण्यासाठी आणि खर्चातही बचत करण्यासाठी असा दुहेरी हेतू या सौर ऊर्जेतून साध्य करण्याचा मेडिकल प्रशासनाचा प्रयत्न आहे. २०१७ या प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावेळी ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण’कडून सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मेडिकलच्या इमारतीची पाहणी करण्यात आली होती. परंतु पुढे निधीअभावी हा प्रकल्प थंडबस्त्यात पडला होता. अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी अधिष्ठातापदाची धुरा सांभाळताच प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन समितीकडून ६ कोटींची तरतूद करण्यात आली असून प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे.

मेडिकलच्या इमारतीवर सौर पॅनल

सौरऊर्जेतून वीज निर्मिती करण्यासाठी मेडिकलचा अपघात विभाग, वॉर्ड क्र. १३, १२, २८, ३२, ३३, पूर्व भागातील संपूर्ण विंग, मार्ड वसतिगृह, मुला-मुलींचे वसतिगृह, नर्सिंग होस्टेलच्यावर सौर पॅनल लावले जाणार आहे. साधारण १० हजार ३०० स्क्वेअर मीटरवर लावण्यात येणाऱ्या या पॅनलमधून १२६० किलो वॅट विजेची निर्मिती होणार आहे.

मेडिकलच्या विकासासाठी प्रयत्न 

सौर ऊर्जा हा स्वच्छ अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत आहे. ऊर्जा बचत आणि विजेवर होणारा खर्च कमी करण्यासाठी सौर ऊर्जा आवश्यक ठरत आहे. म्हणूनच मेडिकलमधील इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प लावण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकतेच जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला असून महाऊर्जा विभागीय कार्यालयाने तांत्रिक मंजुरीही दिली आहे. मेडिकलच्या विकासासाठी असे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

-डॉ. सुधीर गुप्ता

अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: Medical to be lit by solar energy: 6 crore project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.