मेडिकलमध्ये ‘बायोमेट्रिक’ सुरू
By admin | Published: September 4, 2015 02:50 AM2015-09-04T02:50:51+5:302015-09-04T02:50:51+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलायातील (मेडिकल) डॉक्टरांवर नजर ठेवण्यासाठी अखेर ‘बायोमेट्रिक’ मशीन सुरू झाली आहे.
डॉक्टरांवर वॉच : हजेरी वही बंद
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलायातील (मेडिकल) डॉक्टरांवर नजर ठेवण्यासाठी अखेर ‘बायोमेट्रिक’ मशीन सुरू झाली आहे. गुरुवारी दोन मशीन लागल्या असून शुक्रवारी पुन्हा दोन मशीनची भर पडणार आहे.
मेडिकलचा बाह्यरुग्ण विभाग सकाळी ८ वाजता सुरू होतो. मात्र, वरिष्ठांसह अनेक डॉक्टर ८ च्या ठोक्याला मेडिकलमध्ये राहत नाही. काही विभाग प्रमुखांचा तर १० वाजल्यानंतरच प्रवेश होतो. सायंकाळनंतर तर यापेक्षा भयानक स्थिती असते. काही वरिष्ठ डॉक्टर केवळ फोनवर उपलब्ध असतात. अलीकडच्या काळात तर गंभीर रुग्णांचा एक्स-रे, सिटी स्कॅन, एमआरआयचा मोबाईलने फोटो काढून तो वरिष्ठांना पाठवून त्यांचा सल्ला घेण्याचे प्रकारही वाढले आहेत. यावर लगाम लागावा यासाठी बायोमेट्रिक सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मेडिकलमध्ये २०११ मध्ये बायोमेट्रिक पद्धतीने हजेरीचा पहिला प्रयोग अयशस्वी झाला. परंतु डीएमईआरकडून पुन्हा बायोमेट्रिक हजेरीचा बडगा आला आणि वैद्यकीय अधीक्षक कक्षातून २९ एप्रिल २०११ रोजी बायोमेट्रिक हजेरीचे आदेश निघाले. बायोमेट्रिक यंत्र लागले. काही महिने ते चाललेही. परंतु तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार रुजू होताच हे यंत्र बंद पडले. हजेरी वही सुरू झाली. आता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी बंद पडलेली यंत्रणा नव्याने सुरू केली आहे. गुरुवारी दोन मशीन लागल्या असून शुक्रवार पुन्हा दोन मशीन लागणाऱ्या आहेत. या मशीन मेडिकलच्या चार मुख्य द्वारावर लावण्यात येतील. (प्रतिनिधी)