मेडिकलची रक्तपेढी बंद

By admin | Published: October 30, 2015 02:49 AM2015-10-30T02:49:44+5:302015-10-30T02:49:44+5:30

आदर्श रक्तपेढीचा पुरस्कार मिळालेल्या मेडिकलच्या रक्तपेढीतील त्रुटींवर बोट ठेवत त्या दूर होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी सायंकाळी दिल्याने खळबळ उडाली आहे.

Medical Blood Bank Off | मेडिकलची रक्तपेढी बंद

मेडिकलची रक्तपेढी बंद

Next

रुग्णसेवा अडचणीत : त्रुटी दूर झाल्यानंतरच सुरू करण्याचे एफडीएचे आदेश
नागपूर : आदर्श रक्तपेढीचा पुरस्कार मिळालेल्या मेडिकलच्या रक्तपेढीतील त्रुटींवर बोट ठेवत त्या दूर होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी सायंकाळी दिल्याने खळबळ उडाली आहे. दररोज अत्यावश्यक उपचाराचे सुमारे हजार रुग्ण तसेच शंभराहून अधिक शस्त्रक्रिया होत असलेल्या या रुग्णालयाच्या रक्तपेढीचे अचानक कामकाज बंद पडल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे, तर ही ‘रुटीन अ‍ॅक्टिव्हिटी’ असल्याचे एफडीएचे म्हणणे आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाच्या (मेडिकल) दुरवस्थेबाबत नेहमीच ओरड होत असते. परंतु याच अपुऱ्या संसाधनाच्या बळावर राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) मेडिकलच्या रक्तपेढीने सलग तीन वर्षे आदर्श रक्तपेढीचा पुरस्कार मिळविला आहे. खासगी रक्तपेढ्यांच्या स्पर्धेत दरवर्षी ११ हजारावर रक्तपिशव्यांचे संकलन करून गरीब रुग्णांना तत्काळ रक्त उपलब्ध करून देत आहे. मात्र, याच रक्तपेढीवर ‘एफडीए’ने त्रुटी काढल्या आहेत. रक्तपेढीची अयोग्य रचना, आरोग्यवर्धक नसलेले रक्त गोळा करण्याचे ठिकाण, अयोग्य पद्धतीने होत असलेले रक्तपिशव्यांवरील ‘लेबलिंग’ व ‘एलायझा रिडर’ मशीनमधील दोष, सेल्स कॉऊंट मशीन आणि पी.एच. मीटर मशीन नसल्याच्या या प्रमुख त्रुटी एफडीएने काढल्या आहेत. या त्रुटी दूर होईपर्यंत रक्तदात्यांकडून रक्त घेणे, रक्ताची तपासणी करणे व रक्त गोळा करण्याची प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहे. यामुळे बुधवार सायंकाळी ५ वाजतापासून रक्तपेढीचे कामकाज बंद पडले आहे. विशेष म्हणजे, त्या पूर्वीपर्यंत तपासलेले रक्तपिशव्या रुग्णांना उपलब्ध करून देण्याचे आदेश एफडीएने दिले आहे. परंतु मागण्याच्या तुलनेत उपलब्ध रक्तपिशव्यांचा साठा फार कमी आहे, परिणामी गंभीर रुग्णांनाच रक्त उपलब्ध करून दिले जात असून सामान्य रुग्णांना याचा फटका बसत आहे.
ज्या शक्य होत्या, त्या त्रुटी केल्या दूर
सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी ‘एफडीए’ने रक्तपेढीची पाहणी केली तेव्हा त्यांनी काढलेल्या अनेक त्रुटी, उदा. रक्तपिशव्यांवरील ‘लेबलिंग’, स्वच्छतेवर विशेष लक्ष देऊन त्यात सुधारणा करण्यात आली. आवश्यक यंत्रसामग्रीसाठी संबंधित विभागाकडे प्रस्तावही पाठविला. सप्टेंबर महिन्यात एफडीएने पुन्हा तपासणी केली असता त्यांनी या गोष्टींचे कौतुकही केले. परंतु बुधवारी त्रुटी दूर न झाल्याचे कारण देत कामकाज बंद ठेवण्याचे तडकाफडकी आदेश दिले.
रक्तपेढी बंद करण्याची दिली होती धमकी
मेडिकल रक्तपेढीच्या काही कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा रक्तपेढीच्या अधिकाऱ्याला रक्तपेढी बंद करण्याची धमकी दिली होती. ही धमकी बुधवारी खरी ठरली. सोबतच पत्रकारांना याची माहिती देऊ नका, अशी तंबीही दिली होती.
केवळ २०० रक्तपिशव्या शिल्लक
मेडिकलच्या रक्तपेढीतून दिवसाकाठी ६० ते ७० वर रक्तपिशव्या रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु बुधवारी सायंकाळपासून रक्त घेणे, तपासणे व गोळा करण्याचे कामकाज बंद पडल्याने २९० रक्तपिशव्यांमधून गुरुवारी सायंकाळपर्यंत २०० रक्तपिशव्या उरल्याची माहिती आहे. शनिवारपर्यंत अशीच स्थिती राहिल्यास रुग्णांवर रक्तासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ शकते, असे वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Web Title: Medical Blood Bank Off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.