वैद्यकीय व्यवसायातील मूल्ये हरविली

By admin | Published: March 20, 2017 01:57 AM2017-03-20T01:57:23+5:302017-03-20T01:57:23+5:30

वैद्यकीय व्यवसाय मूल्यहीन झाला असून, रुग्णांची जास्तीतजास्त आर्थिक पिळवणूक करण्याचाच विचार सध्या होतो,

Medical business values ​​are lost | वैद्यकीय व्यवसायातील मूल्ये हरविली

वैद्यकीय व्यवसायातील मूल्ये हरविली

Next

सतीश गोगुलवार यांचे मत : ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना’मध्ये प्रकट मुलाखत
नागपूर : वैद्यकीय व्यवसाय मूल्यहीन झाला असून, रुग्णांची जास्तीतजास्त आर्थिक पिळवणूक करण्याचाच विचार सध्या होतो, असे खळबळजनक मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार यांनी वैद्यांचे महत्त्व सांगताना व्यक्त केले.
वनौषधी वापरून विविध आजारांवर उपचार करणारे वैद्य गुरू-शिष्य परंपरेतून तयार होतात. ते कधीच पैशांचा हव्यास करीत नाहीत. रुग्णाने स्वत:हून दिले तेवढे पैसे ते ठेवून घेतात. त्यामुळे त्यांच्या उपचाराला व्यवसायाचे स्वरूप आले नाही. ते सेवा म्हणून हे काम करतात. सामाजिक मूल्ये जपल्यामुळे त्यांनी पैसा कमावला नाही. शेती व अन्य व्यवसायांतून ते स्वत:चा उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासारखी मूल्ये डॉक्टरांमध्ये दिसून येत नाहीत, असे गोगुलवार म्हणाले. नष्ट होत चाललेली वैद्यांची उपचार पद्धत जिवंत ठेवण्यासाठी लेखी माहिती नोंदविण्यासह अन्य आवश्यक उपाययोजना सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रयास व सेवांकुर संस्थेच्या ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना’ या उपक्रमांतर्गत रविवारी सिव्हिल लाईन्सस्थित चिटणवीस सेंटर येथे डॉ. गोगुलवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या कार्याची माहिती देतानाच विविध विषयांवर परखड विचार व्यक्त केले. ही ३६ वी प्रकट मुलाखत होती. संस्थेचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश सावजी यांनी डॉ. गोगुलवार यांना प्रश्न विचारले. या उपक्रमाशी जुळलेल्या प्राजक्ता अतुल व्यासपीठावर उपस्थित होत्या.
गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण का कमी आहे, या प्रश्नाच्या उत्तरातून गोगुलवार यांनी अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरी समस्या प्रकाशात आणली. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाशी एकरूप झाले आहेत. ते शेतीसोबत मोहफुले व तेंदुपत्त्यातून पैसे मिळवितात. शेतीमध्ये स्वत:ची बियाणे वापरतात. रासायनिक खतांचा वापर करीत नाहीत. बँका व सावकारांकडून कर्ज काढत नाहीत. बचत गटांच्या माध्यमातून आवश्यक खर्च करतात. खाण्याच्या बऱ्याच गोष्टी त्यांना जंगलातून उपलब्ध होतात. परिणामी आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती निर्माण होत नाही. अन्य जिल्ह्यांत रोख पिके घेण्यासाठी भरमसाट कर्ज घेऊन शेतीमध्ये पैसा ओतला जातो. अशा वेळी नापिकी झाल्यास शेतकरी आत्महत्या करतात, अशी दाहक माहिती गोगुलवार यांनी दिली.
चांगल्या भविष्यासाठी जल, जमीन व जंगलांचे रक्षण करणे आवश्यक आहे. प्रभावी वनौषधी व पौष्टिक खाद्य जंगलातून उपलब्ध होते. अन्न व पाणी दिवसेंदिवस विषारी होत असल्यामुळे विविध गंभीर आजार तोंड वर काढत आहेत. पंजाबमध्ये दूषित पाणी व प्रदूषणामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. हा आजार आता सर्वत्र पसरत आहे. आपल्याकडे आजार झाल्यावर उपचार घेतले जातात.
परंतु आजाराला दूर ठेवण्याचे प्रयत्न होत नाहीत. आरोग्य सुदृढ ठेवणे आपल्या हातात आहे, याकडे गोगुलवार यांनी लक्ष वेधले.(प्रतिनिधी)

गोगुलवार यांचा अल्प परिचय
१९७५ मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वातील चळवळीदरम्यान स्थापन झालेल्या छात्र युवा संघर्ष वाहिनी संघटनेमध्ये गोगुलवार यांनी कार्य केले आहे. येथे त्यांच्यावर समाजकार्याचे संस्कार झाले. त्यामुळे त्यांनी १९८१ मध्ये एम.बी.बी.एस. झाल्यानंतर आणि घरी व्यापारी पार्श्वभूमी असतानाही वैद्यकीय व्यवसाय थाटून पैसा कमावला नाही. त्यांनी १९८४ मध्ये पत्नी शुभदा देशमुख यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी कार्य सुरू केले. त्याकरिता ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था स्थापन केली. सध्या ही संस्था गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील २०० गावे तर, नागपुरातील ४५ झोपडपट्ट्यांमध्ये कार्यरत आहे. गोगुलवार यांनी स्थानिक पातळीवर उपचार करणाऱ्या वैद्यांसोबत २० वर्षे काम करून झाडपाला व अन्य उपचारांचा अभ्यास केला आहे. त्यांनी देशभरातील १५०० वर महिलांना औषधे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

Web Title: Medical business values ​​are lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.