मेडिकल : सफाई कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:42 PM2020-03-17T22:42:32+5:302020-03-17T22:56:41+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अटेन्डंट म्हणून कार्यरत असलेले अभिजीत या खासगी कंपनीच्या १६० कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक संपाचे हत्यार उपसले.वेतनात वाढ व पगारी सुटीची त्यांची मागणी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अटेन्डंट म्हणून कार्यरत असलेले अभिजीत या खासगी कंपनीच्या १६० कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक संपाचे हत्यार उपसले. वेतनात वाढ व पगारी सुटीची त्यांची मागणी होती. यात मेडिकलचा कुठलाही संबंध नाही. परंतु रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून याची दखल वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी घेतली. सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गामुळे सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करीत असताना संपावर तोडगा काढण्याचे समुपदेशन केले. यामुळे रात्रीच्या पाळीत सर्व कर्मचारी आपल्या कामावर परतले.
मेडिकलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. यामुळे अटेन्डंटची शेकडो पदे रिक्त आहेत. रुग्णांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डातून ने-आण करणे, त्यांचे नमुने प्रयोगशाळेत घेऊन जाणे, त्यांची शुश्रूषा करणे आदी कामे खोळंबली जायची. रुग्णसेवा प्रभावित व्हायची. यावर उपाय म्हणून शासनाने कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अभिजीत कंपनीला कंत्राटी पद्धतीवर अटेन्डंटचे काम देण्यात आले. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपासून ही कंपनी मेडिकलमध्ये सेवा देत आहेत. येथील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार, वेतन १२ हजारावर असताना पाच हजार वेतन दिल्या जाते. पगारी सुटीही मिळत नाही. कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. या संदर्भात अनेकदा कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा झाली, परंतु ते ऐकून घ्यायला तयार नाहीत. यामुळे मंगळवारी सकाळपासून संप पुकारला. परंतु कोरोना संसर्गाची सर्वत्र पसरलेली दहशत, संशयित रुग्णांची वाढती संख्या व वैद्यकीय अधीक्षक डॉ. गावंडे यांनी मध्यस्थी केल्याने रात्रीच्या पाळतील सर्व कर्मचारी कामावर हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.