मेडिकल कॉलेज इस्पितळ पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 09:11 PM2018-07-06T21:11:52+5:302018-07-06T21:22:23+5:30
पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या अनेक भागात पाणी शिरले, तर काही विभागांचे छत गळायला लागल्याने डॉक्टरांसह रुग्णही भिजले. विशेष म्हणजे, शल्यक्रिया विभागाच्या आकस्मिक विभागात गुडघाभर पाणी साचल्याने तारांबळ उडाली. गंभीर रुग्णांना बाजूच्या वॉर्डात स्थानांतरित करावे लागले. जळीत रुग्णांच्या वॉर्डात पावसाचे पाणी शिरल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. पावसाचा फटका शस्त्रक्रियांनाही बसला. दोन्ही आकस्मिक विभागासमोर पाणी साचून राहिल्याने रुग्णांना पाठीवर घेऊन किंवा उचलून न्यावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या अनेक भागात पाणी शिरले, तर काही विभागांचे छत गळायला लागल्याने डॉक्टरांसह रुग्णही भिजले. विशेष म्हणजे, शल्यक्रिया विभागाच्या आकस्मिक विभागात गुडघाभर पाणी साचल्याने तारांबळ उडाली. गंभीर रुग्णांना बाजूच्या वॉर्डात स्थानांतरित करावे लागले. जळीत रुग्णांच्या वॉर्डात पावसाचे पाणी शिरल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. पावसाचा फटका शस्त्रक्रियांनाही बसला. दोन्ही आकस्मिक विभागासमोर पाणी साचून राहिल्याने रुग्णांना पाठीवर घेऊन किंवा उचलून न्यावे लागले.
मेडिकलमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची ही पहिली घटना नाही. सलग पाच-सहा तास मुसळधार पाऊस झाल्यास रुग्णालयात पाणी शिरते. शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी शल्यक्रिया विभागाच्या आकस्मिक विभागात शिरले. यावेळी खाटेवर दहावर रुग्ण होते. पाहतापाहता गुडघाभर पाणी साचले. पाणी जायला जागा नसल्याने करावे काय, हा प्रश्न होता. डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णांना बाजूच्या वॉर्डात हलविले. विशेष म्हणजे, आकस्मिक विभागाच्या किरकोळ शस्त्रक्रियागृहातही पाणी शिरले. सर्वत्र पाणीचपाणी असल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली होती. मात्र सफाई कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सकाळी ८ वाजतापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत या विभागातील पाणी उपासण्याचे काम केले. यामुळे दुपारनंतर पुन्हा हा विभाग रुग्णसेवेसाठी सुरू होऊ शकला.
वॉर्ड चारमध्ये शिरले पाणी
शल्यक्रिया विभागांतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक चारमध्ये भिंतीमधून बाहेरील पावसाचे पाणी शिरू लागल्याने तारांबळ उडाली. सकाळी ८ वाजता गुडघाभर पाणी साचलेले होते. रुग्णांच्या खाटांखालून पाणी वाहत होते. बाहेर मुसळधार पाऊस आणि वॉर्डात साचत असलेल्या पाण्यामुळे काही वेळेसाठी भीतीचे वातावरण तयार झाले होते. सफाई कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून पाणी बाहेर काढले, परंतु यात चार-पाच तासांचा वेळ लागला. वॉर्डात पाणी शिरल्याची ही पहिलीच घटना असल्याचे एका परिचारिकेने सांगितले.
एक्स-रे, सोनोग्राफीचे रुग्ण भिजले
मेडिकलच्या एक्स-रे विभागातील सोनोग्राफी कक्ष हा खोलगट भागात आहे. या भागात नेहमीच बाहेरचे पाणी आत येते, शिवाय छताला व भिंतीलाही गळती लागल्याने या भागात एक फूट पाणी साचले होते. त्यास्थितीतही सोनोग्राफी तपासणीसाठी विशेषत: महिला रुग्ण भिजत रांगेत बसले होते. कर्करोग विभागाकडे जाणाºया मार्गाचे छतही गळत असल्याने व्हरांड्यात पावसाचे पाणी साचले होते. रुग्णांना पाण्यातून वाट काढत जावे लागले. तर मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या समोरही पावसाचे पाणी साचून राहिल्याने रुग्णांना अडचणीचे गेले.
प्रतीक्षालयही पाण्यात
अस्थिरोग विभागाच्यासमोर असलेल्या आणि वॉर्ड क्र. ४च्या बाजूला असलेल्या प्रतीक्षालयातही पावसाचे पाणी शिरले. बाहेर पाऊस आणि प्रतीक्षालयाचे छत गळत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना कुठे थांबावे हा प्रश्न पडला होता. वॉर्ड क्र. ३० प्रसूतीच्या वॉर्डाच्या एका खोलीतील छत गळत होते. तळमजल्यावरील प्रयोगशाळेच्या समोर एक फूट पाणी साचले होते. रुग्णांना या पाण्यातून वाट काढावी लागली. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
आकस्मिक विभागासमोर पाच फूट पाणी
दोन्ही आकस्मिक विभागाचे प्रवेशद्वार खोलगट भागात आहे. यामुळे परिसरातील पावसाचे पाणी या भागात साचून राहते. शुक्रवारी चार ते पाच फूट पाणी साचले होते. यामुळे रुग्णांना या पाण्यातून वाट काढत आत यावे लागले. काहींनी रुग्णांना उचलून तर कोणी रुग्णाला पाठीवर धरून विभागाच्या आत नेले. सर्वत्र पाणीचपाणी असल्याने डॉक्टरांसह परिचारिकांना रुग्णसेवा देण्यास अडचणीचे गेले.
शस्त्रक्रियांनाही बसला फटका
मुसळधार पावसामुळे अनेक डॉक्टर सकाळच्या वेळेत आपल्या विभागात पोहचू शकले नाही. तर काही रुग्णांचे नातेवाईक शस्त्रक्रियेला उपस्थित राहू शकले नसल्याने काही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या.