नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळाची रुग्णसेवा प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:47 PM2017-12-13T23:47:40+5:302017-12-13T23:56:55+5:30
अधिसेविकाने एका परिचारिकेकडून वॉर्डाची स्वच्छता करून घेतल्याविरोधात मेडिकलच्या परिचारिकेने बुधवारी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपासले. परिणामी, रुग्णसेवा प्रभावित झाली होती.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : अधिसेविकाने एका परिचारिकेकडून वॉर्डाची स्वच्छता करून घेतल्याविरोधात मेडिकलच्या परिचारिकेने बुधवारी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपासले. परिणामी, रुग्णसेवा प्रभावित झाली होती. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी या प्रकरणाला गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश देत दोन्ही अधिसेविकांना सक्तीच्या रजेवर पाठविले. या निर्णयाचे स्वागत करीत रात्री ८ वाजता परिचारिकांनी कामबंद आंदोलन मागे घेतले.
सोमवारी वॉर्डाचा राऊंड घेत असताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी यांना वॉर्ड ३६ मध्ये कचरा व घाण असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्यासोबत अधिसेविका ईस्टर जोसेफ व वैशाली तायडे होत्या. त्यांनी ही सफाई कर्मचाऱ्यांकडून करून घेणे अपेक्षित होते. परंतु सफाईसाठी परिचारिकेला जबाबदार धरून त्यांच्याकडून फर्शी व खिडक्या पुसून घेतल्या. या अपमानास्पद वागणुकीची तक्रार संबंधित परिचारिकेने महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशनकडे केली. या प्रकरणाने संतापलेल्या मेडिकलच्या सर्व परिचारिकांनी बुधवारी सकाळी ८ वाजेपासून कामबंद आंदोलन पुकारले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे मेडिकल अडचणीत सापडले. रुग्णसेवेचा कणा असलेल्या परिचारिकाच संपावर गेल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली. तात्पुरती सोय म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी ४०० नर्सिंग विद्यार्थ्यांकडे मेडिकलचे एकूण ४९ वॉर्ड, आकस्मिक विभाग व बाह्यरुग्ण विभागाची जबाबदारी दिली. परंतु नवख्या विद्यार्थ्यांमुळे रुग्णसेवा सुरळीत होण्यापेक्षा आणखी अडचणीत आली. दुसरीकडे विधिमंडळाच्या तोंडावर परिचारिकांचे कामबंद आंदोलन चर्चेचा विषय झाला. यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे आंदोलन मागे घेण्यासाठी परिचारिकांवर दबाव टाकला. अखेर अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी कठोर भूमिका घेत अधिसेविका ईस्टर जोसेफ व वैशाली तायडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश काढले.
चौकशीचे दिले आदेश
डॉ. निसवाडे यांनी या प्रकरणासाठी चौकशी समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले. या समितीत औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. योगेंद्र बन्सोड, मायक्रोबॉयलॉजीच्या डॉ. सुनंदा श्रीखंडे, स्त्री रोग व प्रसुतीरोग विभागाचे डॉ. जितेंद्र देशमुख व नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष कल्पना विंचूरकर आदींचा समावेश करून तीन दिवसात या समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
रात्री ८ वाजता आंदोलन मागे
महाराष्टÑ गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशनच्या कार्यकारी कार्याध्यक्षा तनुजा घोरमारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, दिवसभराच्या घडामोडीनंतर अधिष्ठात्यांनी दोन्ही अधिसेविकांना सक्तीच्या रजेवर पाठविले. सोबतच, चौकशी समितीत असोसिएशनच्या अध्यक्षांचा समावेश केला आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यास शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची ग्वाही दिली. यामुळे रात्री ८ वाजता कामबंद आंदोलन मागे घेतले. रात्री ८.३० वाजेपर्यंत सर्व परिचारिका आपल्या कामावर परतल्या होत्या.